अस्नोडा पार नदीत रिसॉर्टकडून सांडपाणी, कचरा टाकण्याचे प्रकार

प्रदुषणाच्या तक्रारीवरून प्रदूषण मंडळ, रिसॉर्ट, पेयजल खात्याला नोटीस

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
23 mins ago
अस्नोडा पार नदीत रिसॉर्टकडून सांडपाणी, कचरा टाकण्याचे प्रकार

पणजी : अस्नोडा येथील पार नदीत जवळच्या रिसॉर्टमधून कचरा तसेच सांडपाणी (सीवेज) सोडण्याच्या प्रकारामुळे नदीचे पाणी प्रदुषित झाले आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर गोवा मानवाधिकार आयोगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, पेयजल खात्याचे मुख्य कार्यकारी अभियंता तसेच रिसॉर्टच्या व्यवस्थापकाला नोटीस बजावली आहे. या नोटिशी प्रकरणी २६ ऑगस्ट रोजी लेखी बाजू सादर करण्याचा आदेश गोवा मानवाधिकार आयोगाने दिला आहे.

मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बी. पी. देशपांडे, सदस्य प्रमोद कामत व डेस्मंड डिकोस्ता यांनी हा आदेश दिला आहे. अस्नोड्यासह बार्देश तालुक्याला पार नदीचे पाणी वापरले जाते. ही नदी कचरा व सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेली आहे. क्लब महिंद्रा रिसॉर्ट/हॉटेलकडून रात्रीचा कचरा टाकला जातो. तसेच गुप्तपणे सांडपाणी सुद्धा सोडले जाते, अशी तक्रार अस्नोडा ग्रामस्थांनी केली आहे. पाणी दुषीत झाल्याने संपूर्ण बार्देश तालुक्यातील जनतेच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती आहे. त्वरीत कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या तक्रारीची दखल घेत आयोगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, पेयजल खात्याचे मुख्य कार्यकारी अभियंता व क्लब महिंद्रा रिसॉर्टच्या व्यवस्थापकाला नोटीस बजावली आहे. याबद्धल २६ ऑगस्ट रोजी नोटिसा बजावलेल्या सर्वांना लेखी स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा