दक्षिण गोव्यात ऑगस्टमध्ये दहा दिवसांत ७१ जणांना डेंग्यू

जुलैमध्ये ९१ रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह : ताप आल्यास तत्काळ चाचणी करण्याचे आवाहन

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
6 mins ago
दक्षिण गोव्यात ऑगस्टमध्ये दहा दिवसांत ७१ जणांना डेंग्यू

मडगाव : दक्षिण गोव्यात ऊन-पावसाच्या लहरी वातावरणामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर वाढली असून, त्यामुळे डेंग्यूसारख्या साथरोगांचा प्रसार वेगाने होत आहे. दक्षिण गोव्यात जुलै महिन्यात ९१ जणांना डेंग्यूची लागण झाली होती, तर चालू ऑगस्ट महिन्याच्या अवघ्या १० दिवसांतच ७१ नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ताप किंवा इतर लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता तत्काळ रक्ताची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांनी केले आहे.
पावसाळ्यात ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि निर्माण झालेली अस्वच्छता यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. परिणामी, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत डेंग्यूची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ झाली आहे.आरोग्य खात्यातर्फे डेंग्यूचा प्रभाव जास्त असलेल्या संवेदनशील भागात धूर फवारणी (फॉगिंग) आणि डास प्रतिबंधक औषधांची फवारणी वेगाने सुरू आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक घरोघरी जाऊन डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट करत असून नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
घराच्या छतावर, कुंड्यांमध्ये, जुन्या टायर्समध्ये अथवा कुलरमध्ये पाणी साचू देऊ नये.
पिण्याचे व वापराचे पाणी नेहमी झाकून ठेवावे आणि साठवलेले पाणी नियमितपणे बदलावे.
डासांपासून बचावासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत, तसेच डास प्रतिबंधक क्रीम किंवा मच्छरदाणीचा वापर करावा.
ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी किंवा अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास घरातच अंगावर काढू नका. त्वरित जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात जाऊन रक्ताची मोफत तपासणी करून घ्या.
-डॉ. राजेंद्र बोरकर, वैद्यकीय अधीक्षक, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय
आकडे वारी
महिन्यानुसार डेंग्यू रुग्णांची आकडेवारी
महिना                      पॉझिटिव्ह रुग्ण      रुग्णालयात दाखल रुग्ण
मे                             ९                         ८
जून                          ३९                       २९
जुलै                         ९१                        ७९
ऑगस्ट                    ७१                        २७
(१० तारखेपर्यंत) 

हेही वाचा
सर्व पहा