पर्वरीतील रस्ते, पदपथांवर वाहने उभी करण्याच्या प्रकारांवर अंकुश आणा!

सुकूर ग्रामसभेत मागणी : शेतजमिनीत नारळाची रोपे लावण्यास आक्षेप

Story: गोवन वार्ता। न्यूज डेस्क |
34 mins ago
पर्वरीतील रस्ते, पदपथांवर वाहने उभी करण्याच्या प्रकारांवर अंकुश आणा!

पर्वरी : सुकूर पंचायतीच्या ग्रामसभेत रस्ते आणि पदपथांवर उभी केली जाणारी वाहने, शेतजमिनीत नारळाची रोपे लावणे, मासळी बाजार आणि वीज बिलावर चर्चा करण्यात आली. पर्वरीतील रस्ते, पदपथांवर वाहने उभी करण्याच्या प्रकारांवर अंकुश आणावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून त्याखालील रस्ते रुंद करण्यात आले आहेत. लोक आता आपली वाहने या रस्त्यांवर उभी करू लागले असल्याने वाहन चालवणे कठीण झाले आहे. तसेच फळे आणि भाजीपाला विक्रेते पदपथांवर बसलेले दिसतात. त्यामुळे पंचायतीने या बाबीवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करावी, असे सॉर्टर डिसोझा यांनी सांगितले.

इफा वाझ यांनी सांगितले की, जोसवाडो येथे एका शेतकऱ्याने शेतजमिनीत नारळाची रोपे लावली आहेत. याबाबत विचारणा केली असता, संबंधित शेतकऱ्याने सुकूर पंचायतीच्या एका पंचसदस्याने रोपे लावण्यास परवानगी दिल्याचे सांगितले. मात्र, म्हापसा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली असता, अशा प्रकारची परवानगी देण्यात येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात पंचायतीने हस्तक्षेप करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

पंचायतीवर सौर पॅनेल बसवल्यानंतर वीज बिलात काही कपात झाली आहे का, हे ग्रामस्थांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर सरपंचांनी उत्तर दिले की, २०२५-२६ या वर्षाचे वीज बिल १७,६७,३४४ रुपये इतके आले आहे. तसेच, वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी पंचायतीने भाडेतत्त्वावर एक स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर घेतला आहे, असेही सरपंचांनी सांगितले.

सुकूरमध्ये योग्य असा मासळी बाजार नसल्याने मासळी विक्रेते रस्त्याच्या कडेला मासे विकत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर सरपंचांनी कोमुनिदादने मासळी बाजारासाठी जागा निश्चित केली असल्याचे सांगितले.

सरपंच सोनिया पेडणेकर यांनी स्वागत केले. सचिव सतीश गावस यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. राजेंद्र पार्सेकर यांनी आभार मानले. 

हेही वाचा
सर्व पहा