वास्को : सत्तरी तालुक्यातील एका धबधब्यावर शाळेच्या ट्रेकिंग उपक्रमादरम्यान १६ वर्षीय विद्यार्थी राहुल बिंद याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर, वास्को येथील बायणा परिसरात प्रचंड संतापाचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी राहुलच्या शोकाकुल पालकांचे सांत्वन करण्यासाठी ‘दीप विहार’ शाळेचे मुख्याध्यापक आणि एक शिक्षक त्यांच्या घरी पोहोचले असता, राहुलच्या आईने ‘माझा मुलगा मला परत आणून द्या!’ असा टाहो फोडत शाळेच्या कारभारावर तीव्र आक्रोश व्यक्त केला.
तणावाची शक्यता गृहीत धरून शाळेचे प्रतिनिधी पोलिसांच्या संरक्षणात राहुलच्या घरी आले होते. मात्र, परिसरात नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले आणि त्यांनी शाळा प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली.
शाळेचे सांत्वन स्वीकारण्यास नकार
शोकाकुल पालकांनी शाळेचे सांत्वन स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. ट्रेकिंगदरम्यान अघटित घडल्याचे समजल्यावर जेव्हा कुटुंबीय शाळेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांना कोणताही योग्य प्रतिसाद मिळाला नाही, असा गंभीर आरोप पालकांनी केला. आपल्या मुलाची स्थिती जाणून घेण्यासाठी कुटुंबीय धावपळ करत असताना, राहुलचा ट्रेकिंगदरम्यानच मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी त्यांना नंतर कळाली. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी हात जोडून बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु कुटुंबीयांनी सांत्वनाची गरज नसून ‘राहुलच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करा’ अशी ठाम मागणी केली.
चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी
राहुलच्या पालकांनी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. या घटनेची सविस्तर व सर्वसमावेशक चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची विनंती ते करणार आहेत. या चौकशीत शिक्षक, मुख्याध्यापिका, शाळा व्यवस्थापन, टूर ऑपरेटर्स आणि ट्रेकिंग आयोजित करणाऱ्या सर्वांच्या भूमिकेचा समावेश असावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. भविष्यात अशा निष्काळजीपणामुळे इतर कोणत्याही कुटुंबावर ही वेळ येऊ नये, यासाठी शालेय सहली व उपक्रमांसाठी अधिक कठोर सुरक्षा नियमावली लागू करण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे.


