काब्रालांचे तिकीट कापल्यास कुडचडेवर करणार दावा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारीसाठी गावस देसाईंचे संकेत

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
08th August, 11:42 pm
काब्रालांचे तिकीट कापल्यास कुडचडेवर करणार दावा

मडगाव : कुडचडे मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई यांनी व्यक्त केली आहे. विद्यमान आमदार नीलेश काब्राल यांना आगामी निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न देण्याचा निर्णय झाल्यास आपण कुडचडेच्या भाजप उमेदवारीसाठी १०० टक्के दावा करणार, असे गावस देसाई यांनी स्पष्ट केले.
कुडचडे मतदारसंघातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना गावस देसाई म्हणाले की, नीलेश काब्राल मागील तीन टर्मपासून भाजपचे आमदार म्हणून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी मतदारसंघात चांगले काम केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला अद्याप सुमारे सहा महिन्यांचा कालावधी असून, भाजपने उमेदवारीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
कुडचडे मतदारसंघात अनेक विकासकामे झाली असून, आणखी विकासकामे होणे बाकी आहेत. विकासाची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. मतदारसंघातील वातावरण बिघडू नये आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते एकत्र राहावेत, या उद्देशाने आपण कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करणार नाही, असेही गावस देसाई यांनी सांगितले.
सिद्धार्थ गावस देसाई यांनी २००७ ते २०१२ या काळात पंच आणि सरपंच म्हणून काम केले आहे. त्यानंतर २०२० पासून ते जिल्हा पंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर कुडचडे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची आपली तयारी असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.
पक्षाच्या निर्णयानंतरच भूमिका
निवडणुका जाहीर होण्यापूर्वी कोणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत भूमिका स्पष्ट करणे योग्य ठरणार नाही. पक्षाकडूनही अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत, असे गावस देसाई यांनी सांगितले. मात्र, काब्राल यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्यास किंवा त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी पक्षातील काहीजणांकडून झाल्यास आपण उमेदवारीसाठी दावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.      

हेही वाचा
सर्व पहा