कोरगावात ७.६५ लाखांचा ड्रग्ज साठा जप्त

दोघांना अटक : अमली पदार्थांवर पेडणे पोलिसांचा छापा

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
08th August, 11:33 pm
कोरगावात ७.६५ लाखांचा ड्रग्ज साठा जप्त

पेडणे : येथील पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाईला वेग देत कोरगाव येथील एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकून सुमारे ७ लाख ६५ हजार ६०० रुपये किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईत चरस, एलएसडी ब्लॉट पेपर्स, एक्स्टसी पावडर आणि केटामाईन पावडर जप्त करण्यात आली असून, दोन संशयितांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी पहाटे २.३५ ते सकाळी ६.४० या कालावधीत कोरगाव-मेनवाडा येथील घर क्र. ३२०/ए मधील भाड्याच्या खोलीत ही कारवाई करण्यात आली.

कारवाईत आरोन गोम्स (वय ४१, मूळ रा. मालाड पश्चिम, मुंबई; सध्या रा. मेनवाडा, कोरगाव) आणि जकारिया (वय ३५, मूळ रा. वर्धा, महाराष्ट्र; सध्या रा. थोरबाग, केरी) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. संशयितांच्या ताब्यातील भाड्याच्या खोलीत अमली पदार्थ लपवून ठेवण्यात आल्याचे पोलिसांनस समजले होते.

मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पेडणे पोलीस स्थानकात एनडीपीएस कायद्याच्या कलम २०(बी)(ii)(ए), २२(सी), २१(बी), २२(बी) सह २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना शनिवारी सकाळी १०.२० वाजता अटक करण्यात आली.

कारवाई पेडणे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक जयप्रकाश जानकर यांच्या तक्रारीवरून करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक जानकर करीत असून, पेडणे पोलिस निरीक्षक नितीन व्ही. हळर्णकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीदेवी बी. व्ही. यांच्या देखरेखीखाली तसेच उत्तर गोवा पोलीस अधीक्षक हरीशचंद्र मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

कोरगावातील भाड्याच्या खोलीत ड्रग्जचा साठा

पेडणे तालुक्यातील कोरगावसारख्या भागातील भाड्याच्या खोलीत विविध प्रकारचे अमली पदार्थ एकाचवेळी सापडल्याने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. या अमली पदार्थांचा स्रोत, ते कोणाला पुरविले जाणार होते तसेच या व्यवहारामागे आणखी व्यक्ती किंवा जाळे कार्यरत आहे का, याचा शोध पुढील तपासातून घेतला जाणार आहे.

जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ

पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात ८१ ग्रॅम चरस, ३.१२ ग्रॅम वजनाचे १३० एलएसडी ब्लॉट पेपर क्यूब्स, १ ग्रॅम एक्स्टसी पावडर आणि ३.६० ग्रॅम केटामाईन पावडर असा मुद्देमाल जप्त केला. या सर्व अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत ७ लाख ६५ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 

ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत ड्रग्ज प्रकरणी १२ जणांना अटक

म्हापसा : ऑपरेशन प्रहार मोहिमेंतर्गत अमली पदार्थ, गुन्हेगारी आणि बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध पोलिसांनी राज्यव्यापी धडक मोहीम राबवून ड्रग्जचे १० गुन्हे नोंदवून १२ जणांना अटक केली. तसेच मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केला.

शुक्रवार, दि. ७ रोजी रात्री राज्यभर पोलिसांनी ही मोहीम राबवली. जिल्हा पोलीस, आतंकवाद विरोध विभाग (एटीएस), ड्रग्ज विरोधी विभाग (एएनसी) किनारी पोलीस (कोस्टल विभाग), वाहतूक पोलीस, गुन्हे शाखा, रेल्वे पोलीस आणि इतर पथकांचा समावेश होता. गांजा, एलडीसी, कोकेन, चरस, केटामाइन आणि एक्स्टसी हे मादक पदार्थ जप्त करण्यात आले.

मोहिमेचा एक भाग म्हणून, रेल्वे पोलिसांनी थिवी व मडगाव रेल्वे स्थानकांवर श्वानपथकांसोबत ११ रेल्वे गाड्यांची तपासणी केली. कोकण रेल्वे आणि दक्षिण-पश्चिम रेल्वे मार्गांवर या गाड्या आहेत. पोलिसांनी गोवा ते महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मार्गांवर धावणाऱ्या १२० पेक्षा जास्त आंतरराज्यीय बसेसची तपासणी केली. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून ५०० हून अधिक प्रवाशांची पडताळणी केली.

याशिवाय मोक्याच्या ठिकाणी व्यापक नाकाबंदी आणि वाहन तपासणी करण्यात आली. यामध्ये १ हजारहून जास्त वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या सुमारे ५० जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. तसेच वैध व्हिसाची मुदत संपूनही गोव्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या २ विदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, प्रहार ऑपरेशनच्या अनुषंगाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ‘ड्रग्ज मुक्त गोवा’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आगामी तीन वर्षांचा सर्वसमावेशक कृती आराखडा तयार केल्याची माहिती पोलीस खात्याने दिली आहे. 

हेही वाचा
सर्व पहा