पणजी : मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवण्याची धमकी देत आणि बनावट ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून बार्देश येथील एका नौदल अधिकाऱ्याला १.१४ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सायबर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बार्देश येथील एका नौदल अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदाराला नेहा शर्मा या महिलेने (९४५१७१६१५७) तसेच बलराज सिंग (९४५३१७९५०७) आणि प्रदीप सिंग (७५७७८९८७०२) या व्यक्तींनी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी असल्याचे सांगून संपर्क साधला. या संशयितांनी तक्रारदाराचे बँक खाते मनी लाँड्रिंग प्रकरणाशी जोडल्याची माहिती दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (आरबीआय) बनावट कागदपत्रे दाखवून तक्रारदाराला अटकेची आणि बँक खाती गोठवण्याची धमकी दिली. या भीतीपोटी तक्रारदाराला कॅमेऱ्यासमोर ठेवून ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराने संशयितांनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये १.१४ कोटी रुपये जमा केले. सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर विभागात तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी वरील अज्ञात मोबाईल धारकाविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-डी अंतर्गत गुन्हा नोंद केला. दरम्यान, सायबर विभाग संशयितांनी वापरलेले मोबाईल क्रमांक व बँक खात्यांच्या आधारे कसून शोध घेतला जात आहे.


