राहुल बिंदच्या निधनाची बातमी ऐकताच आईने फोडला हंबरडा

सत्तरीतील धबधब्याच्या पाण्यात बुडून झाला मृत्यू

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
10 hours ago
राहुल बिंदच्या निधनाची बातमी ऐकताच आईने फोडला हंबरडा

वास्को : येथील सासमोळे भागात राहणारा व सडा येथील दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी राहुल बिंद (१७) याचा वाळपई येथे एका धबधब्याच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. याची माहिती राहुलच्या आईला समजताच त्याच्या आईने हंबरडा फोडला.

राहुल बिंद बुडल्याची बातमी ऐकताच दीपविहार विद्यालयाचे प्राचार्य तसेच शिक्षक वर्गाला मोठा धक्का बसला आहे. राहुल याच्या घरी त्याच्या मृत्यूचे वृत्त कळताच त्याच्या आईने हंबरडा फोडला.

दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयात वाणिज्य व विज्ञानच्या शाखा आहेत. या दोन्ही शाखांचे एकूण आठ वर्ग आहेत. शुक्रवार, दि. ७ रोजी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक निरनिराळ्या ठिकाणी गेले होते. काही दक्षिण भागात तर काही उत्तर भागात गेले होते. त्यापैकी विज्ञान विभागाचे इयत्ता अकरावीच्या वर्गाचे विद्यार्थी व शिक्षक सावर्डेच्या बाजूने वाळपई येथे ट्रेकिंगसाठी गेले होते. यामध्ये वीस विद्यार्थी व चार शिक्षकांचा समावेश होता. या ट्रेकिंगसाठी जाणकारांची मदत घेण्यात आली होती. ट्रेकिंगसाठी पुढे जाताना वाटेत तोणीर धबधबा लागल्याने राहुल पाण्याकडे गेला. तथापी तेथील पाण्याच्या प्रवाहाचा त्याला अंदाज आला नसल्याने तो पाण्याच्या आत ओढला गेला. यावेळी काहीजणांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न फोल ठरले. याप्रकरणी पोलीस, अग्निशमन दल यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. राहुल पाण्याजवळ कसा गेला हे मात्र स्पष्ट झाले नाही.

राहुल हा बुडाल्याची माहिती मिळताच प्राचार्यानी इतर ठिकाणी गेलेल्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांना माघारी येण्याचा संदेश पाठविला. या बातमीमुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही धक्का बसला.

दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक सायंकाळी उशीरापर्यंत शाळेतच होते. वाळपई येथे विद्यार्थी व शिक्षकांना घेऊन गेलेली बस न परतल्याने ते वाट पाहत तेथे थांबले होते.

मनमिळावू राहुलच्या मृत्यूने हळहळराहुल याच्या घरी सदर बातमी कळताच त्याच्या आईने हंबरडा फोडला. तेथे शेजारी, आसपासचे लोक जमा झाले. राहुल याला चार भाऊ व एक बहिण आहे. राहुल हा भावडांमध्ये सर्वात लहान होता. मनमिळावू अशा राहुलच्या मृत्यूची बातमी सगळीकडे पसल्याने त्याच्या घराकडे लोकांची गर्दी होऊ लागली. सायंकाळी उशीरापर्यंत त्याच्या घराबाहेर लोक जमले होते. 

हेही वाचा
सर्व पहा