पणजी : मोरजी येथे अॅड. अंकुर कुमार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेतली असून या प्रकरणात न्यायालयाला सहाय्य करण्यासाठी अॅड. नेहाल वेर्णेकर यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ ऑगस्ट रोजी होणार आहे.मोरजी येथील तेमवाडा समुद्रकिनारी उभारण्यात आलेल्या कथित अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर १७ जुलै रोजी जमीनमालक अनिल प्रभाकर नाईक आणि त्यांचे वकील अॅड. अंकुर कुमार घटनास्थळी गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी दिलीप मोरजे, ध्रुव मोरजे यांच्यासह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती.
या प्रकरणी सुनावणीदरम्यान मांद्रे पोलिसांच्या तपासातील निष्काळजीपणाची नोंद घेत उच्च न्यायालयाने तपास दुसऱ्या पोलीस निरीक्षकाकडे सोपविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार हा तपास कोलवाळचे पोलीस निरीक्षक संजित कांदोळकर यांच्याकडे वर्ग करण्यात आला.
वकील संरक्षण कायद्यावर विचार
गोवा उच्च न्यायालय बार संघटनेने वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाकडे निवेदन सादर करून स्वतंत्र वकील संरक्षण कायद्याची मागणी केली होती. याची दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि अॅड. नेहाल वेर्णेकर यांना तेलंगणा वकील संरक्षण कायद्याच्या धर्तीवर गोव्यातही असा कायदा लागू करण्याबाबत विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकरणाची पुढील सुनावणी २४ ऑगस्ट रोजी होणार आहे.


