प्रतिनिधी गोवन वार्ता
पणजी : मला विरोधी पक्षांच्या बैठकीला बोलवले होते की नाही, हा प्रश्न महत्त्वाचा नाही. सध्या सरकारविरोधी सशक्त पर्याय तयार करणे महत्त्वाचे आहे. याआधी दोनवेळा जनतेची फसवणूक झाली आहे. जनतेच्या मनात शंका निर्माण होऊ नये यासाठी आम्हाला स्वतंत्रपणे काम करावे लागेल, अशी प्रतिक्रिया आमदार विजय सरदेसाई यांनी दिली. बुधवारी पणजीत गोवा फॉरवर्ड पक्षाच्या राजकीय कामकाज समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
सरदेसाई म्हणाले की, सध्या विरोधी पक्षांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे, हे समजण्याइतपत परिपक्वता असली पाहिजे. एसीत बसून चर्चा करण्यापेक्षा रस्त्यावर उतरणे आवश्यक आहे. आम्ही पक्ष मजबूत करण्यासाठी आवश्यक ते सर्व करणार आहोत. युतीबाबत चर्चेसाठी मी पुढाकार घेऊन गिरीश चोडणकर यांच्या घरी गेलो होतो. तिथे चर्चा सुरू झाली होती; मात्र दुसऱ्याच दिवशी व्यत्यय आला. त्यानंतर अनेकदा चर्चा सुरू झाली आणि बंद झाली. या सर्वांचा मला कंटाळा आला आहे. मी साडेचार वर्षे विरोधी पक्ष म्हणून काम केले आहे. नेहमीच विरोधी पक्षांसोबत राहिलो आहे. येत्या अधिवेशनातही मी विरोधी पक्ष म्हणूनच काम करणार आहे.
मागील काही दिवस विजय सरदेसाई युतीच्या चर्चेबाबत उत्सुक नाहीत, असे पसरवले जात आहे. वास्तविक आमचा पक्षच मागील दोन वर्षे ‘विरोधकांनी एकत्र झाले पाहिजे’, असे म्हणत आहे. मात्र प्रत्येक वेळी विरोधकांनी याला प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे आम्ही आता युतीबाबतच्या चर्चेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
_ मोहनदास लोलयेकर, सरचिटणीस, गोवा फॉरवर्ड


