मतभेदांमुळे भाजपविरोधकांच्या एकीवर प्रश्नचिन्ह

भाजपविरोधी पक्षांशी चर्चेस तयार : गिरीश चोडणकर


05th August, 11:23 pm
मतभेदांमुळे भाजपविरोधकांच्या एकीवर प्रश्नचिन्ह

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : राज्यातील जनता भाजप सरकारला वैतागली आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपला सत्तेबाहेर काढावे, असे जनतेला वाटते. आम्हीदेखील याच मताचे आहोत. भाजपविरोधी असणाऱ्या कोणत्याही पक्षासोबत खुल्या मानाने युतीची चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या अंतर्गत गोष्टींवर आम्ही प्रतिक्रिया देणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले.
चोडणकर म्हणाले की, गोवा फॉरवर्ड पक्षाच्या राजकीय कामकाज समितीचा निर्णय हा त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे. असे असले तरी आम्ही युतीबाबत गंभीर आहोत. आम्ही आमची दारे अद्याप बंद केलेली नाहीत. आम्ही भाजपला हरवण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी करणार आहोत. यासाठी आम्ही अधिक आक्रमक उपाययोजना, उपक्रम करणार आहोत. प्रत्येक समस्येचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. सोबत कोण आहे याचा विचार न करता काम सुरूच राहील.
गोमंतकीय आमच्यासोबत आहेत. त्यांना भाजप सरकार नको आहे. जनतेची इच्छा असल्याने आम्ही युतीची चर्चा सुरू ठेवली आहे. आम्ही आरजीपीसोबत प्राथमिक चर्चा केली आहे. दोन ते तीन दिवसांत त्यांना अधिकृत पत्र पाठवले जाईल. आम आदमी पक्षासोबतही चर्चा सुरू करणार आहोत. त्यांचा गैरसमज दूर केला जाईल. निवडणुकीत सर्वांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न सुरूच राहतील.
_ गिरीशी चोडणकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस


युतीसाठी काँग्रेसकडून प्रस्ताव नाही : वीरेश बोरकर
विधानसभा निवडणुकीसाठी आरजीपीने युतीबाबत निर्णय घेतलेला नाही. युतीसाठी आमची दारे उघडी आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी तोंडी चर्चा झाली आहे. त्यांच्याकडून लेखी प्रस्ताव येणे अपेक्षित आहे. विरोधी आमदारांच्या बैठकीत केवळ अधिवेशनातील भूमिकेविषयी चर्चा झाली. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी आम्ही युतीसाठी पुढाकार घेतला होता; मात्र आमचा विश्वासघात झाला. त्यामुळे विधानसभेला काँग्रेसला गरज वाटत असेल तर ते प्रस्ताव पाठवतील. युतीसाठी आम्ही तयार असल्याचे काँग्रेसला कळवले आहे, असे आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले.             

हेही वाचा
सर्व पहा