एसटी आरक्षणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी सकारात्मक चर्चा: मुख्यमंत्री डॉ. सावंत

दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी अनुक्रमे एसटी आरक्षण व पर्यटन-आयटी क्षेत्राच्या विकासाबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा केली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
45 mins ago
एसटी आरक्षणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी सकारात्मक चर्चा: मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी गोव्यातील एसटी आरक्षणाच्या कार्यवाहीबाबत झालेली चर्चा निश्चितपणे फलदायी ठरेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. एसटी आरक्षणासोबतच राज्यातील विकासकामे आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर गृहमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरून गोव्यात परतताच प्रसारमाध्यमांना दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे मंगळवारी सायंकाळी तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. मंगळवारी रात्री त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या वेळी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी करतानाच त्यांनी गृहमंत्र्यांना गोवा भेटीचे अधिकृत निमंत्रणही दिले. मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ६ आणि ७ सप्टेंबर असे दोन दिवस गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, गृहमंत्र्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर लगेचच पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीही बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट करतानाच, गोव्यातील पर्यटन तसेच आयटी (माहिती तंत्रज्ञान) क्षेत्राच्या विकासावर गृहमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती रोहन खंवटे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या अचानक झालेल्या दिल्ली भेटीनंतर लगेचच पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्वतंत्रपणे अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


हेही वाचा
सर्व पहा