गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : राज्यातील एक हजारांहून अधिक कंत्राटी आणि व्याख्यान पद्धतीवरील शिक्षकांना भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) योजनेचा लाभ मिळणार आहे. काही शिक्षकांना ईपीएफचा लाभ मिळण्यास सुरुवातही झाली आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांकडून मिळाली. कंत्राटी आणि व्याख्यान पद्धतीवरील शिक्षकांना ईपीएफचा लाभ देणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य असल्याचेही सांगण्यात आले.
प्राथमिक शाळांपासून महाविद्यालयीन स्तरापर्यंत विविध ठिकाणी कंत्राटी तसेच व्याख्यान पद्धतीवर (लेक्चर बेसिस) शिक्षक कार्यरत आहेत. कायमस्वरूपी शिक्षकांच्या तुलनेत या शिक्षकांना कमी वेतन मिळते. व्याख्यान पद्धतीवरील शिक्षकांना अनेकदा चार महिन्यांनंतर वेतन मिळते. कायमस्वरूपी शिक्षकांना मिळणाऱ्या सुविधा आणि लाभ या शिक्षकांना मिळत नाहीत. आता ईपीएफची सुविधा लागू झाल्याने कंत्राटी आणि व्याख्यान पद्धतीवरील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्राथमिक शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीवर शिक्षक आहेत; मात्र व्याख्यान पद्धतीवर शिक्षक नाहीत. विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात व्याख्यान पद्धतीवर शिक्षक कार्यरत आहेत. प्रत्येक उच्च माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालयांत किमान दोन ते तीन व्याख्यान पद्धतीवरील शिक्षक आहेत. महाविद्यालयांमध्ये अशा शिक्षकांची संख्या अधिक आहे. कायमस्वरूपी व्याख्याते आणि प्राध्यापकांची भरती होत नसल्याने कंत्राटी किंवा व्याख्यान पद्धतीवर शिक्षक घ्यावे लागतात. त्यामुळे कायमस्वरूपी शिक्षकांवरील कामाचा ताण कमी होतो, अशी माहिती प्राचार्यांकडून मिळाली.
२०१७ पासून कार्यरत असलेल्यांना लाभ
२०१७ पासून कंत्राटी किंवा व्याख्यान पद्धतीवर कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांना ईपीएफचा लाभ मिळणार आहे. मात्र, त्यांची सेवा सातत्यपूर्ण असणे आवश्यक आहे. एखाद्या वर्षी एखादा शिक्षक सेवेत नसल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. उच्च माध्यमिक विद्यालयांचा विचार करता, व्यावसायिक शाखेत सर्वाधिक शिक्षक कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. या सर्वांना ईपीएफचा लाभ मिळणार आहे.
प्राथमिक शाळांमधील कंत्राटी शिक्षकांना सेवेत कायम करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघटनेची आहे. ही मागणी अद्याप मान्य झालेली नाही. मात्र, त्यांना ईपीएफचा लाभ सुरू झाला ही चांगली बाब आहे. कंत्राटी पद्धतीवरील शिक्षकांना कायमस्वरूपी पदे जाहीर झाल्यानंतर अर्ज करावा लागतो. निवड झाल्यास त्यांची कायमस्वरूपी नियुक्ती होते. सर्व कंत्राटी शिक्षकांना सरसकट कायम केले जाणार नाही.
_ कमलाकर देसाई, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना
कंत्राटी आणि व्याख्यान पद्धतीवरील शिक्षकांना ईपीएफ योजना लागू करणे ही समाधानकारक बाब आहे. याचा लाभ मोठ्या संख्येने शिक्षकांना मिळणार आहे.
_ प्रशांत नाईक, अध्यक्ष, उच्च माध्यमिक प्राचार्य मंच
ईपीएफ घेणे ऐच्छिक
सरकारने कंत्राटी आणि व्याख्यान पद्धतीवरील शिक्षकांना ईपीएफ लागू केला असला तरी काही शिक्षकांची त्याचा लाभ घेण्याची तयारी नाही, अशी माहिती एका प्राचार्याने दिली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिक्षकांनी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ईपीएफ योजनेनुसार ठरावीक रक्कम कर्मचाऱ्याच्या पगारातून वजा केली जाते. ज्या कंत्राटी किंवा व्याख्यान पद्धतीवरील शिक्षकांना ही योजना नको आहे, त्यांच्यावर ती सक्तीची केली जाणार नाही.
अल्पसंख्याक शिक्षण संस्थांनी ही योजना लागू केली आहे. मात्र, काही अनुदानित शिक्षण संस्थांनी अद्याप योजना लागू केलेली नाही. योजनेबाबत त्यांना स्पष्टता आलेली नाही. काही मुद्द्यांबाबत संभ्रम असल्याने त्यांनी योजना लागू केलेली नाही.
या योजनेबाबत ईपीएफ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. काही मुद्दे स्पष्ट झाल्यानंतर अनुदानित शिक्षण संस्थांमध्येही ही योजना लागू होण्याची शक्यता आहे.


