हजारो समर्थकांसह विजयी मिरवणुकीत सहभागी झालेले प्रशांत किशोर.
गोवन वार्ता न्यूज डेस्क
बांकीपूर : बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर प्रचंड बहुमतांनी विजयी झाले. त्यांना ६३,२०३ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे नीरज सिन्हा यांना ४४,२५० मते मिळाली. राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) रेखा कुमारी १४,०८५ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे बांकीपूर पोटनिवडणुकीसाठी ३० जुलै रोजी मतदान पार पडले होते.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे नीरज कुमार यांच्यावर तब्बल १८,९६३ मतांची निर्णायक आघाडी घेऊन विजय मिळवला. विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली. यात हजारो समर्थक सहभागी झाले होते. बांकीपूर विधानसभा मतदारसंघ (पूर्वीचा पटना पश्चिम) हा भाजपचा १९९५ पासून अभेद्य गड होता. ३० वर्षांपेक्षा जास्त काळ या मतदारसंघावर एकाच कुटुंबाचे वर्चस्व राहिले. आधी नवीन किशोर प्रसाद सिन्हा आणि नंतर त्यांचे पुत्र नितीन नबीन यांनी सलग पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर नितीन नबीन यांनी राज्यसभा खासदारकीसाठी बांकीपूरच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही पोटनिवडणूक पार पडली. भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर यांनी मिळवलेला विजय सत्ताधारी पक्षाच्या प्रतिष्ठेला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे.
कुठे कमी पडलो याचा अभ्यास करू : भाजप
भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी म्हणाले, आम्ही बांकीपूरमध्ये सातत्याने विकासकामे केली आहेत. पुढेही बांकीपूर आमच्या प्राधान्यक्रमावर राहील. आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी मते का मिळाली, याची आम्ही सखोल अभ्यास करू. विजयी उमेदवार प्रशांत किशोर यांचे अभिनंदन.
जनतेची बाजू विधानसभेत मांडणार : प्रशांत किशोर
विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रशांत किशोर म्हणाले, सरकारने तरुणांच्या शिक्षणावर आणि रोजगारावर काम करायला हवे. तसे केले नाही तर अशीच अवस्था होईल. जनतेने मला आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे विधानसभेत त्यांची बाजू भक्कमपणे मांडणे हे माझे पहिले कर्तव्य असेल.


