अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची विरोधी आमदारांची मागणी

सभापती गणेश गावकर यांना निवेदन देणार ; कामकाजासाठी पुरेसा वेळ नसल्याचा दावा

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
03rd August, 11:48 pm
अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची विरोधी आमदारांची मागणी

पणजी : गोवा विधानसभेचे आगामी पावसाळी अधिवेशन अवघ्या तीन दिवसांचे असल्याने विविध खात्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवून अधिक दिवसांचे अधिवेशन घेण्यात यावे, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षाचे आमदार सभापतींकडे करणार आहेत. यासंदर्भात विधानसभा सभापती गणेश गावकर यांना लवकरच संयुक्त निवेदन सादर करण्याचा निर्णय विरोधी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला.
गोव्याचे पावसाळी विधानसभा अधिवेशन ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत तीन दिवस होणार असून, राज्यपालांनी याबाबतचे समन्स जारी केले आहे. अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षाच्या आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा, अॅल्टन डिकॉस्टा, आम आदमी पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगस, क्रुझ सिल्वा आणि रिव्होल्युशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर उपस्थित होते. मात्र, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई या बैठकीला अनुपस्थित राहिले.
तीन दिवसांत ८३ खात्यांवर चर्चा अशक्य
बैठकीनंतर माहिती देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, पहिल्या दिवशी २५ खात्यांच्या, दुसऱ्या दिवशी २२ खात्यांच्या, तर तिसऱ्या दिवशी तब्बल ३६ खात्यांच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे. अवघ्या तीन दिवसांत एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या खात्यांवर सविस्तर चर्चा करणे शक्य नाही. आमदारांना जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी वेळच मिळणार नाही, म्हणूनच अधिवेशनाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी आम्ही सभापतींकडे करत आहोत.
लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडणारच : विजय सरदेसाई
विरोधी आमदारांच्या बैठकीला गैरहजर राहिलेले गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, माझ्यासोबत इतर कोणी असो वा नसो, मी विधानसभेत जनतेचे प्रश्न ठामपणे मांडणार आहे. विरोधी आमदारांच्या बैठकीची मला पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. विरोधी पक्षनेत्यांचा मिस कॉल होता, मात्र मडगाव-फातोर्डा येथे एका पूर्वनियोजित बैठकीत व्यस्त असल्याने मला पर्वरीला पोहोचणे शक्य झाले नाही." दरम्यान, यावर स्पष्टीकरण देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पत्रकारांना सांगितले की, बैठकीत उपस्थित राहण्यासाठी विजय सरदेसाई यांना मेसेजद्वारे निमंत्रण पाठवण्यात आले होते.

हेही वाचा
सर्व पहा