पणजी : मार्च २०२७ नंतर गोवा सरकारने मांडवी नदीतील कॅसिनोंना कोणतीही मुदतवाढ देऊ नये. हे सर्व कॅसिनो तात्काळ बंद करण्यात यावेत किंवा ते समुद्रात हलवण्यात यावेत. तसेच सरकारने नियुक्त केलेल्या गेमिंग आयुक्तांना तत्काळ पूर्ण अधिकार प्रदान करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी तज्ज्ञांनी केली आहे. पणजीकर अगेंस्ट कॅसिनो आणि सेव्ह पणजी ग्रुपच्या वतीने आयोजित पीपल फॉर पणजी या जागृती कार्यक्रमात हे मुद्दे उपस्थित करण्यात आले.
पणजी शहराला भेडसावणाऱ्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तज्ज्ञ क्रिसेल डायस यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, सरकारने रुआ दे ओवरे येथे कॉन्व्हेंशन सेंटर उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या सेंटरमध्ये कॅसिनो सुरू करण्याचा सरकारचा बेत आहे. मात्र, आम्हाला शहरातील सर्व कॅसिनो बंद हवे असून पणजीत आणखी नवीन कॅसिनो कोणत्याही परिस्थितीत येऊ दिले जाणार नाहीत.
सरकारने व्यावसायिक कर आयुक्तांची गेमिंग आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. २०१६ मध्ये ही नेमणूक झाली आणि २०२१ मध्ये मंत्रिमंडळाने या पदाला मान्यता दिली. मात्र, अद्याप गेमिंग आयुक्तांसाठीचे नियम अधिसूचित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आयुक्तांना कोणतेही अधिकार मिळालेले नाहीत, असे सांगत डायस यांनी हे नियम तत्काळ अधिसूचित करण्याची मागणी केली.
हे नियम अधिसूचित झाल्यास कॅसिनोमध्ये चालणाऱ्या खेळांवर आणि व्यवहारांवर थेट लक्ष ठेवता येईल. सर्व खेळ व कागदपत्रांचे रेकॉर्ड उपलब्ध राहील. नियमभंग करणाऱ्या कॅसिनो हॉटेल्सना सील ठोकणे व जहाजे ताब्यात घेण्याचे अधिकार आयुक्तांना मिळतील. कॅसिनोला भेट देणाऱ्या पर्यटकांना परमिट देण्यासाठी तिकिट जारी करणाऱ्या एजन्सींना मान्यता देण्याचे अधिकारही आयुक्तांकडे असतील.
मुख्यमंत्र्यांनी शब्दाला जागून मुदतवाढ रोखावी
पूर्वी कॅसिनोंना ६-६ महिन्यांची मुदतवाढ दिली जात होती. मात्र, यावेळी मंत्रिमंडळाने ३१ मार्च २०२७ पर्यंत (दोन वर्षांसाठी) मुदतवाढ दिली आहे. ही कॅसिनोंना दिलेली शेवटची मुदतवाढ असेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्दाला जागून मार्च २०२७ नंतर कोणत्याही कॅसिनोला मुदतवाढ देऊ नये. तसेच २०२७ मध्ये सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षानेही कॅसिनोंना पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही, याची निश्चिती करावी, अशी मागणी क्रिसेल डायस यांनी केली.


