गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : राज्यात भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याबाबत विरोधी पक्षांमध्ये एकमत असले तरी समान मतदारसंघांवर असलेला दावा युतीसाठी अडथळा ठरत आहे. युतीबाबत चर्चा सुरू होण्यापूर्वीच काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) एकमेकांवर टीका करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी सोमवारी झालेल्या बैठकीला गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई गैरहजर होते.
विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या युतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे विविध संघटना तसेच अनेक नागरिकांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षांमध्ये एका बैठकीत युतीबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर आता युतीच्या चर्चेला वेग आला आहे. युतीची गरज आणि चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि ‘आप’चे राज्य संघटक वाल्मिकी नाईक यांच्या वक्तव्यांमुळे पुन्हा अडथळे निर्माण झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आप, काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात युती होणे दिसते तितके सोपे नाही. अनेक मतदारसंघांवर तिन्ही पक्षांचा असलेला दावा हा यातील प्रमुख अडथळा आहे.
बाणावली, वेळ्ळी, कुडतरी, कुंकळ्ळी, कुठ्ठाळी, दाबोळी अशा काही मतदारसंघांवर काँग्रेस आणि ‘आप’चा दावा आहे. त्यामुळे युतीबाबत अद्याप चर्चाच सुरू झालेली नाही.
युतीबाबत चर्चेसाठी काँग्रेसकडून समिती स्थापन
दरम्यान, युतीबाबत चर्चा चर्चा करण्यासाठी काँग्रेसने समिती स्थापन केली आहे. प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विधिमंडळ नेते युरी आलेमाव, डॉ. अंजली निंबाळकर, खासदार विरियातो फर्नांडिस, एम. के. शेख हे अन्य सदस्य आहेत.

विश्वास, त्यागाची तयारी असेल तरच युती यशस्वी : गिरीश
‘आप’सोबत युती करण्याबाबत प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, ‘आप’च्या प्रामाणिकपणावर संशय घेण्यासारखी स्थिती आहे. जाहीरपणे युती करण्याची तयारी ‘आप’ दाखवत आहे; मात्र गोव्यातील ‘आप’चे नेते काँग्रेसच्या मतदारसंघांवर दावा करून टीका करत आहेत. दोन्ही बाजूंमध्ये विश्वास आणि त्यागाची तयारी असेल तरच युती यशस्वी होईल. काँग्रेस हा जुना पक्ष आहे. सर्व मतदारसंघांत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मतदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ११ मतदारसंघांत विजय मिळाला होता. काही मतदारसंघांत अवघ्या काही मतांनी काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे त्या मतदारसंघांवर काँग्रेस दावा करणारच. युतीसाठी इतर पक्षांनी काही प्रमाणात त्याग करण्याची तयारी ठेवावी, मित्रपक्षाबद्दल आदर असावा. आदर आणि विश्वास असेल तरच चर्चा पुढे जाऊ शकते, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केले.

कुणी सोबत असो वा नसो, लोकांचे प्रश्न मांडणार : विजय सरदेसाई
सोमवारी विरोधी पक्षाच्या आमदारांची बैठक होणार असल्याची पूर्वकल्पना किंवा अधिकृत माहिती आपल्याला मिळाली नव्हती. या विषयाला राजकीय वळण देण्याचा किंवा राजकीय नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. पर्वरी येथे विरोधी आमदारांची बैठक सुरू असल्याचे आपल्याला आता समजले. सायं. ५.०७ वा. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा मिस् कॉल आला होता. तोही केवळ दोन सेकंदांचा होता. आपण फातोर्डा येथे असून पर्वरीतील बैठकीला आता जाणे शक्य नाही. मात्र लोकांनी घाबरण्याची गरज नाही. लोकांचे प्रश्न मांडणे हीच आपली प्राथमिकता आहे. भाजप सरकार जे काही करत आहे, ते लोकांसमोर आणून लोकांच्या समस्या विधानसभेत मांडण्यात येतील. ज्यांना बैठक करायची आहे, त्यांनी ती करावी. विरोधी आमदार किती सोबत आहेत, हे लोकांनाही माहीत आहे. कुणी सोबत असो वा नसो, लोकांचे प्रश्न मांडणार असून विधानसभा अधिवेशन वाया जाऊ देणार नाही, असा निर्धार गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी बोलून दाखवला.

दिल्लीतही काँग्रेसकडून ‘आप’विरोधात टीका : वाल्मिकी नाईक
भाजपला पराभूत करण्यासाठी गोव्यात विरोधी पक्षांची युती व्हावी, अशी ‘आप’ची इच्छा आहे. मात्र ‘आप’चे आमदार असलेल्या वेळ्ळी आणि बाणावली मतदारसंघांत काँग्रेस पक्ष ‘आप’वर जाहीरपणे टीका करतो. दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते ‘आप’वर टीका करतात. याकडे गिरीश चोडणकर आणि काँग्रेसच्या नेत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. युतीसाठी काँग्रेसने ‘आप’ला चर्चेचे निमंत्रण द्यावे. युतीसाठी ‘आप’ इच्छुक आहे, असे ‘आप’चे गोवा संघटक वाल्मिकी नाईक यांनी सांगितले.

‘आपला युती नको’ असे दाखवण्याचा प्रयत्न : व्हेंझी व्हिएगस
२०१२ पूर्वी गोव्यात काँग्रेसचे सरकार होते. आम्ही बरेच काही बोलू शकतो; मात्र आम्ही बोलत नाही. ‘आम्हाला युती हवी आहे; मात्र ‘आप’ला ती नको आहे’, असे दाखवण्याचे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत. लोकांना सर्व काही माहिती आहे. त्यामुळे हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे ‘आप’चे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी सांगितले.
बैठकीला विजय सरदेसाई गैरहजर
विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी पर्वरी विधानभवनात विरोधी आमदारांची बैठक झाली. या बैठकीला गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई वगळता इतर सर्व आमदार उपस्थित होते. मला बैठकीचे निमंत्रण नव्हते, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले. मात्र आपण त्यांना कॉल केला होता. व्हॉट्सअॅपवर बैठकीला येण्यासाठी संदेश पाठवला होता, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते युरी आलेमाव यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत त्यांनी हा संदेशही दाखवला.
अंतर्गत वादामुळे आरजीची स्थिती विचित्र
आरजीचे वीरेश बोरकर हे एकमेव आमदार असले तरी पक्षाचा प्रमुख कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अंतर्गत वादामुळे पक्षात दोन गट पडले आहेत. हे गट एकमेकांविरोधात कारवाया करत आहेत. अंतर्गत वादामुळे युतीबाबत चर्चा झाली तर आरजीतर्फे कोण पुढाकार घेणार, हा प्रश्न आहे. आमदार बोरकर यांना पक्षातून काढून टाकले असले तरी विधिमंडळाला याबाबत पक्षाने काहीही कळवलेले नाही. आरजीचा अध्यक्ष किंवा समिती याबाबतही स्पष्टता नाही. काँग्रेस, आप आणि गोवा फॉरवर्ड यांच्यातील चर्चेच्या बातम्या येत असताना आरजीकडे मात्र अद्याप कोणीही कोणताही चर्चेचा प्रस्ताव ठेवलेला नाही.


