पणजी :गोवा विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमाती (एसटी) समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ‘युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स’ (उटा)ने राज्यभर जनआंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आर्थिक बळ मिळावे यासाठी एसटी समाजातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या एका महिन्याच्या पगारातील १० टक्के रक्कम देणगी म्हणून द्यावी, असे आवाहन संघटनेने केले आहे.
९ हजार कर्मचाऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा
राज्यात एसटी समाजाचे सुमारे ७,००० कर्मचारी विविध सरकारी खात्यांमध्ये कार्यरत आहेत. याशिवाय अनुदानित संस्था, महामंडळे आणि इतर सरकारी संस्थांमध्ये सुमारे २,००० कर्मचारी कार्यरत आहेत. अशा प्रकारे एकूण ९,००० एसटी कर्मचाऱ्यांकडून या जनआंदोलनासाठी आर्थिक सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
गोवा विधानसभेत अनुसूचित जमाती समाजासाठी राजकीय आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. समाजाच्या हिताचे संरक्षण आणि धोरणात्मक निर्णयप्रक्रियेत प्रभावी सहभाग सुनिश्चित करण्यासाठी विधानसभेत पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याचा दावा ‘उटा’ने केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने एसटी आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या राजकारणातील प्रमुख विषय ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर व्यापक जनजागृती मोहीम, संघटनात्मक उपक्रम आणि आंदोलन अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या देणगी निधीचा वापर करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.


