गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : केंद्र सरकारने शनिवारी राज्य सरकारांना कर हस्तांतरणाचा १.०९ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त हप्ता जारी केला. याशिवाय १० ऑगस्ट रोजी जारी करण्यात येणारा नियमित मासिक हप्तादेखील जारी करण्यात येणार आहे. यामध्ये गोव्याला ३९८ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. राज्यांच्या भांडवली आणि विकासात्मक खर्चाला गती देण्यासाठी त्यांची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी हा निधी जारी करण्यात आला आहे.
या निधीमुळे राज्यातील पायाभूत सुविधा व विकासकामांना गती मिळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली. अर्थ खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या यंदाच्या जुलै महिन्याच्या जीएसटी संकलनात २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा जुलै महिन्यात जीएसटीद्वारे एकूण ४५५ कोटी रुपये महसूल गोळा करण्यात आला आहे. गतवर्षीच्या जुलै महिन्यात जीएसटी संकलन ३७० कोटी रुपये होते.
जुलै महिन्यात केंद्रीय वाटा मिळण्यापूर्वी गोव्यातून २६४ कोटी रुपये कर जमा झाला आहे. जुलै २०२५ मध्ये ही रक्कम २०९ कोटी रुपये होती. यंदा या रकमेत २६ टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलै दरम्यान केंद्र सरकारने गोव्यातून ९४३ कोटी रुपये कर संकलित केला आहे. यामध्ये इंटिग्रेटेड जीएसटी (आयजीएसटी) द्वारे जमा केलेल्या २६२ कोटी, सीजीएसटीद्वारे ३०८ कोटी, तर एसजीएसटीद्वारे जमा करण्यात आलेल्या ३७४ कोटी रुपयांचा समावेश आहे.
जुलैमध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी संकलन
देशाचा विचार करता जुलै महिन्यात जीएसटी संकलन २.११ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. देशाचे जीएसटी संकलन मागील वर्षीच्या जुलै महिन्यापेक्षा १५.४ टक्क्यांनी जास्त आहे. जुलै २०२५ मध्ये १.८३ लाख कोटी रुपयांहून अधिक संकलन झाले होते. जुलै महिन्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक १८,५२९ कोटी जीएसटी संकलन झाले. गुजरातमधून ८,४१८ कोटी, उत्तर प्रदेशमधून ८,०२८ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले. जुलैमध्ये मणिपूरमधून सर्वांत कमी ६१ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले.


