पणजीः सांताक्रुझ मतदारसंघात बाबूश मोन्सेरात यांच्या हालचालींमुळे आमदार रुडोल्फ फर्नांडीस (बाबा) संतप्त झाले आहेत. एकाच मतदारसंघात भाजपच्या दोन कचेऱ्या कशा असू शकतात, याविषयी पक्षाला जाब विचारणार, अशी प्रतिक्रिया आमदार फर्नांडीस यांनी दिली आहे. मोन्सेरात यांचे समर्थक आग्नेल डिकून्हा आपली विकासकामे बंद करायला शोधतात असा आरोपही केला आहे.
२०२७च्या विधानसभा निवडणुकीत सांताक्रुझ मतदारसंघात मी भाजपचा आमदार निवडणून आणणार असे काही दिवसांपूर्वी बाबूश मोन्सेरात यांनी जाहीर केले होते. या दरम्यान मोन्सेरात यांचे समर्थक तसेच पीए सांताक्रुझ मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती पुढे येत होती. या घडामोडींनंतर दोन दिवसांपूर्वी सांताक्रुझ येथे मोन्सेरात यांनी आपल्या कार्यालयाची पाहणी केली. याला स्थानिक आमदार फर्नांडिस यांनी आक्षेप घेतला आहे.
मी भाजपचा आणि मोन्सेरात हेही भाजपचेच. भाजपच्या एका जागी दोन कचेऱ्या असू शकत नाहीत. नवे कार्यालय उघडण्यात येत असल्याचे समजल्यावर किती तरी भाजप समर्थकांनी मला फोन करून काय चालले आहे, असे विचारले असे फर्नांडिस यांनी सांगितले.
कार्यालय उघडण्यामागे मोन्सेरात यांचा हेतू काय ते मला माहिती नाही. पण मोन्सेरात यांचा पीए आग्नेल डिकून्हा मतदारसंघात विध्वंस करायला बघत आहे. जी काही माझी कामे चालू आहेत ती, बंद पाडण्यासाठी फिरत आहे. मी माझी कामे कुणालाही बंद करण्यास देणार नाही. या आमच्या घरात भाजपचा उमेदवार जिंकणार हे मी सांगू इच्छितो असे फर्नांडिस यांनी सांगितले.
मी आमदार या नात्याने मोन्सेरात यांनी मला विचारायला हवे होते. पक्षाचे भले व्हायला हवे असे विचार असायला हवेत. आम्ही पक्षाचे भले चिंतीत आहोत; आम्हाला भाजप सरकार याठिकाणी आलेले हवे.
लोकांचे समर्थन पाहिल्यास तसेच मुख्यमंत्र्यानी माझी कामे केली आहेत; त्या हिशोबाने लोक माझ्याबरोबर आहेत. येथे दोन कार्यालये कशी आली ते मी विचारणार. मला भाजपच्या सरकारवर विश्वास आहे. भाजप हा तत्वनिष्ठ पक्ष, इतर पक्षांसारखा नाही, असे स्पष्टीकरण फर्नांडिस यांनी दिले.


