मासेमारी हंगामाला १५ दिवसांचा विलंब शक्य

खराब हवामान, कामगारांच्या टंचाईमुळे बोटमालकांसमोर समस्या

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
31st July, 11:35 pm
मासेमारी हंगामाला १५ दिवसांचा विलंब शक्य

पणजीः दोन महिन्यांच्या बंदीनंतर शनिवारी, १ ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाला औपचारिक सुरुवात होणार आहे. मात्र, खवय्या गोवेकरांना ताज्या माशांची चव चाखण्यासाठी आणखी १० ते १५ दिवस वाट पाहावी लागणार आहे. समुद्रातील खवळलेले वातावरण, प्रतिकूल हवामान आणि परराज्यांतील खलाशांची (कामगार) अनुपस्थिती यामुळे सध्या तरी ट्रॉलर्स आणि बोटी धक्का सोडून समुद्रात जाणे कठीण बनले आहे.
१ जून ते ३१ जुलै या कालावधीत गोव्यात खोल समुद्रातील मासेमारीवर कायदेशीर बंदी होती. या काळात गोवेकर नदीतील मासे तसेच परराज्यांतून येणाऱ्या बर्फाच्या माशांवर भागवत होते. १ ऑगस्टपासून मासेमारीला मुभा मिळाली असली, तरी निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीपुढे मच्छीमार हवालदिल झाले आहेत.
मालीम जेटीवरील मांडवी मच्छीमार सहकारी संघटनेचे संचालक संदीप गायक यांनी परिस्थितीची माहिती देताना सांगितले की, दोन-तीन लहान होड्या मासेमारीसाठी तयार आहेत, मात्र समुद्रात वादळी वारे आणि उंच लाटा असल्याने धोका पत्करणे शक्य नाही. काही बोटींवर खलाशी आले आहेत, पण समुद्रात बोट उलटण्याची भीती आहे. याशिवाय, जेटी परिसरात गाळ साचल्याने बोटी काढताना त्या तळाला अडकतात. येथे ड्रेजिंग करण्याची वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.
डिझेलवरील व्हॅट अनुदान सरकारने बंद केल्याने मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. डिझेल महागल्यामुळे जवळपास ४० ते ५० बोटी सध्या बंदच ठेवाव्या लागल्या आहेत. मालीम जेटीवर असलेल्या २५० बोटींपैकी केवळ चार बोटी कामगारांसह तयार आहेत, पण वाऱ्याच्या वेगामुळे त्याही निघू शकत नाहीत.
हवामान शांत झाल्यावरच प्रत्यक्ष मासेमारी
मालीम जेटीवरील बोट मालक संदीप गावकार यांनी सांगितले की, अजून पुरेसा पाऊस होऊन समुद्र शांत झालेला नाही. हवामानाची ही स्थिती पाहता १५ ऑगस्टनंतरच प्रत्यक्ष मासेमारी सुरळीत सुरू होईल. त्यामुळे आम्ही कामगारांना १५ ऑगस्टच्या सुमारास येण्याचे आवाहन केले आहे. तोपर्यंत बोटींच्या दुरुस्तीची आणि जाळ्यांची कामे पूर्ण केली जात आहेत.

हेही वाचा
सर्व पहा