पणजी : बार्देश तालुक्यातील १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर करण्यात आले होते. या प्रकरणी गर्भाचा आणि आरोपीचा डीएनए अहवालातून जैविक संबंध सिद्ध झाला. तसेच इतर वैद्यकीय पुरावे आणि पीडितेच्या साक्षीच्या आधारे पाॅक्सो न्यायालयाने मोहम्मद शाहनशाह (३०, मूळ बिहार) या विवाहित आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास आणि १.९० लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. याबाबतचा निवाडा न्या. डाॅ. पूजा कवळेकर यांनी दिला.
म्हापसा पोलिसांनी ८ नोव्हेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, १७ वर्षीय मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. मुलीच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिला म्हापसा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. त्यानंतर तिला गोमेकॉत नेण्यात आले. तपासणीनंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. आरोपीने मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यात ती गरोदर राहिल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी दिली. याची दखल घेऊन म्हापसा पोलीस उपनिरीक्षक बाबलो परब यांनी गुन्हा नोंद केला. तसेच आरोपी मोहम्मद शाहनशाह (मूळ बिहार) याला अटक केली. आरोपीची चौकशी केली असता, तो विवाहित असून त्याला मुले आहेत. त्याने १ सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या दरम्यान मुलीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून तिला फसवून स्वतःच्या खोलीत नेले. तेथे तिची संमती नसताना तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. या प्रकारानंतर मुलगी गरोदर राहिली.
पीडित मुलीची आणि आरोपीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. याच दरम्यान गर्भपात करण्यात आला. त्यावेळी सदर गर्भाचाही वैद्यकीय चाचणी करण्यात आले. उपनिरीक्षक रवीना सावतोडकर यांनी तपास पूर्ण करून २८ डिसेंबर २०२४ रोजी पाॅक्सो न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन न्यायालयाने २८ मे २०२५ रोजी शाहनशाह याच्याविरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला.
सरकारी अभियोक्ता अर्चना भोबे आणि शिल्पा नागवेकर यांनी बाजू मांडली. त्यात त्यांनी न्यायालयात डीएनए अहवाल तसेच इतर वैद्यकीय अहवाल सादर करून आरोपीविरोधात पुरावे सिद्ध केले. तसेच या प्रकरणी मुलीची आणि तिच्या कुटुंबीयांची साक्ष महत्त्वाची ठरली.
पॉक्सो न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून शाहनशाह याला २० वर्षांचा सश्रम कारावास आणि १.९० लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
आरोपीला सुनावलेली शिक्षा
-- पॉक्सो कायदा कलम ६ अंतर्गत २० वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख रुपये दंड. दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद.
-- बीएनएस कलम ६४ (बलात्कार) अंतर्गत १५ वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड. दंड न भरल्यास ३० दिवसांची साधी कैद.
-- पॉक्सो कायदा कलम ४ अंतर्गत ११ वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद.
-- पॉक्सो कायदा कलम ८ व १२ अंतर्गत अनुक्रमे ३ वर्षे व १ वर्ष सक्तमजुरी. दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद.
-- न्यायालयाने सर्व दंडाची रक्कम वसूल झाल्यानंतर ती पीडित मुलीला भरपाई म्हणून देण्याचा निर्देश जारी केला.


