स्वामी समर्थांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा!

हणजूण पोलिसांत परिवार मठासह चार संघटनांची तक्रार

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
2 hours ago
स्वामी समर्थांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा!

हणजूण पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्याकडे तक्रार सादर करताना स्वामी समर्थांचे भाविक.

म्हापसा : शिवोली येथे उभारण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थांच्या भव्य मूर्तीबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह आणि मानहानीकारक टिप्पण्यांविरोधात श्री स्वामी समर्थ परिवार मठासह चार हिंदू संघटनांनी हणजूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. संबंधित अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गुरुपौर्णिमेच्या औचित्याने शिवोली येथील श्री स्वामी समर्थ मठ परिसरात श्री स्वामी समर्थांची भव्य मूर्ती उभारण्यात आली. मूर्तीच्या अनावरणानंतर व्हॉट्सअॅपसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही अज्ञात व्यक्तींनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकाराचा निषेध करण्यासाठी मठाचे अध्यक्ष नीलेश वेर्णेकर, भाविक आणि विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी हणजूण पोलीस स्थानकात गेले. त्यांनी पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांची भेट घेऊन दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली. त्यानंतर श्री स्वामी समर्थ परिवार मठासह चार संघटनांनी अधिकृत तक्रार दाखल केली.
मठाचे अध्यक्ष वेर्णेकर यांनी सांगितले की, हा केवळ एका धर्माचा विषय नसून मठात सर्व धर्मांचे लोक श्रद्धेने येतात. त्यामुळे सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अवमानकारक टिप्पण्या कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. फेक अकाउंटचा आधार घेऊन प्रशासनाने जबाबदारी टाळू नये, अशी मागणी त्यांनी केली.
आठ दिवसांत अटक न झाल्यास आंदोलन
तक्रारदारांनी संबंधित ऑनलाइन पोस्टमुळे अनुयायी आणि हिंदू समाजातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत दोषींना त्वरित कायदेशीर कारवाई करून अटक करावी, अन्यथा आठ दिवसांत राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

हेही वाचा
सर्व पहा