म्हापसा : हणजूण येथील समुद्रकिनारी खडकावर पाय घसरून वादळी समुद्रात कोसळून यापन शॅरॉन (२६, रा. पर्वरी व मूळ मणिपूर) हा युवक बुडाला. समुद्रात बेपत्ता झालेला हा युवक पणजीतील एका हॉटेलमध्ये कामाला होता व सहकारी कामगारांसमवेत तो घटनास्थळी आला होता.
ही घटना मंगळवारी सायं. ५.४० च्या सुमारास घडली. बेपत्ता यापन शॅरॉन हा आपल्या अजून तीन हॉटेल कर्मचाऱ्यांसमवेत हणजूण समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी आला होता. सुरुवातीला या चार जणांच्या गटातील दोघेजण वादळी लाटा खडकांवर धडकत असूनही समुद्रात उतरले होते. हा प्रकार किनारी निदर्शनास येताच जीवरक्षकांनी त्यांना समुद्रातून बाहेर काढले होते. नंतर जीवरक्षकाची नजर चुकवून यापन हा पुन्हा समुद्राच्या दिशेने गेला व खडकावर पाय घसरून तो पाण्यात कोसळला आणि वादळी लाटांमध्ये वाहून गेला. त्याबरोबर त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. परंतु, वादळी समुद्री लाटांमुळे जीवरक्षकांना त्याला वाचवणे शक्य झाले नाही आणि तो समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाला.
घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलीस आणि म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतु, जोरदार वादळी समुद्री लाटांमुळे त्यांना बचावकार्य हाती घेणे शक्य झाले नाही. याप्रकरणी पुढील तपास हणजूण पोलीस करत आहेत.


