Home >> गुन्हे >> तीस वर्षांपूर्वी पेपरफुटीविरोधात केले होते आंदोलन, आज त्याच मुद्द्यावर द्यावा लागला राजीनामा!

तीस वर्षांपूर्वी पेपरफुटीविरोधात केले होते आंदोलन, आज त्याच मुद्द्यावर द्यावा लागला राजीनामा!

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजकीय प्रवासात ‘काळाचा उलटा फेरा’

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
2 hours ago
तीस वर्षांपूर्वी पेपरफुटीविरोधात केले होते आंदोलन, आज त्याच मुद्द्यावर द्यावा लागला राजीनामा!

पणजी : घटना आहे तीस वर्षांपूर्वीची. ओडिशात १९९७ मध्ये बारावीच्या ‘प्लस टू’ परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपाने विद्यार्थी संतप्त झाले होते. सुमारे १,५०० विद्यार्थ्यांनी भुवनेश्वरमधील सचिवालयाबाहेर आंदोलन छेडले. त्यावेळी अभाविपचे राष्ट्रीय सचिव असलेले तरुण नेते धर्मेंद्र प्रधान या आंदोलनाच्या अग्रस्थानी होते. पोलिसांच्या लाठीमारात त्यांना जबर मारहाणही झाली होती. पुढे चौकशी समिती नेमल्यामुळे ते आंदोलन शमले. मात्र काळाचा उलटा फेरा आज दिसून आला. नीटच्या पेपरफुटीवरून सुरू असेलल्या आंदोलनाने केंद्रात शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांना आज राजीनामा द्यावा लागला.
ओडिशातील त्या आंदोलनानंतर सरकारने चौकशी समिती नेमली, तसेच परीक्षेत काही बदल करण्यात आले. पेपरफुटीविरोधातील या आंदोलनाने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजकीय कारकिर्दीला नवी दिशा दिली.
मात्र, जवळपास तीन दशकांनंतर राजकारणाचा काळाचा फेरा वेगळ्याच वळणावर आला. नीटच्या परीक्षेतील अनियमितता आणि पेपरफुटीच्या आरोपांवरून केंद्रीय शिक्षणमंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉक्रोज जनता पार्टीचे दिल्लीत आंदोलन झाले. आंदोलकांवर पोलिसांना लाठामारही केला. या घटनेमुळे देशभरात संपात व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटीचे प्रकार घडल्यास कारवाईसाठी काही मोठे बदलही जाहीर केले. दोन मंत्र्यांचे शिष्टमंडळ नियुक्त करून आंदोलकांशी चर्चाही घडवून आणली. अखेर शनिवारी दुपारी प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

तीन दशकांपूर्वी उतरले होते रस्त्यावर 
ज्या मुद्द्यावरून तीन दशकांपूर्वी तरुण धर्मेंद्र प्रधान रस्त्यावर उतरले होते, त्याच पेपरफुटीच्या विषयांवरील आरोपांनी तीन दशकांनंतर त्यांचेच मंत्रिपदाचा राजीनामा घेतला. राजकारणातील हा काळाचा उलटा फेरा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. धर्मेंद्र प्रधान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यातील दुवा मानला जातात. ओडिशात सत्तांतरात त्यांची मोठी भूमिकाही आहे. त्यामुळे प्रधान यांच्यावर ही वेळ येईल असे भाजपला आणि संघालाही कधी वाटले नव्हते. सीजेपीच्या आंदोलनाने भाजपच्या एका मोठ्या वजनदार नेत्याला नमते घ्यायला लावले.

हेही वाचा
सर्व पहा