Home >> गुन्हे >> मुंबई विमानतळावर ईडीने ड्रग्ज तस्कराच्या आवळल्या मुसक्या

मुंबई विमानतळावर ईडीने ड्रग्ज तस्कराच्या आवळल्या मुसक्या

क्रिप्टोसह करत होता विदेशी चलनाचा वापर : सात दिवसांची कोठडी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16 mins ago
मुंबई विमानतळावर ईडीने ड्रग्ज तस्कराच्या आवळल्या मुसक्या

पणजी : ड्रग्ज तस्करी प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गोवा विभागाने मोठी कारवाई करत दुबईहून मुंबईत आलेल्या निहाल व्ही. एन. (३९, केरळ) याला मुंबई विमानतळावर अटक केली. मेरशी येथील विशेष (पीएमएलए) न्यायालयाने त्याला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. संशयित निहाल हा ब्राझील आणि थायलंडमधून होणाऱ्या ड्रग्ज तस्करीसाठी क्रिप्टोकरन्सी आणि इतर विदेशी चलनाची व्यवस्था करत असल्याचा आरोप आहे.गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) १४ ऑक्टोबर २०२४ रोजी मध्यरात्री वाडी शिवोली येथील बे व्ह्यूव इमारतीच्या एका फ्लॅटवर छापा टाकला होता. त्यावेळी एएनसीने सराईत ड्रग्ज तस्कर मधूपन सुरेश शशिकला (रा. थिरूवंतपुरस, केरळ) या युवकाला अटक केली होती. त्याच्याकडून १ कोटी १ लाख ६५ हजार २०० रुपये किमतीचे १,८२५ एलएसडी ब्लॉट पेपर, १.०७ ग्रॅमचे ४३ एलएसडी तुकडे, १०२ ग्रॅम उच्च दर्जाचा गांजा आणि ७८.८० ग्रॅम सायलोसायबिन मॅजिक मशरुम हे ड्रग्ज जप्त केले होते.
याची दखल घेऊन ईडीने १७ जानेवारी रोजी आसगाव येथील एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकला होता. त्यावेळी एएनसीच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार मधूपन तिथे आढळून आला. चौकशीत सहकार्य करत नसल्याने ईडीने त्याला अटक केली. याच वेळी ईडीने दाभोलवाडा-शापोरा येथील विशाल पालयेकर याच्या घरावरही छापा टाकला. तेथून विशाल आणि त्याच्या कुटुंबियांची २ कोटी ८३ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर ईडीने गोव्यासह देशभरात २६ ठिकाणी छापे मारले.
लुकआऊट नोटीसनंतर मुंबईत अटक
चौकशीत निहाल व्ही. एन. हा क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करीसाठी आर्थिक व्यवहार सुलभ करत असल्याचे उघड झाले. तो दुबईत वास्तव्यास असल्याने ईडीने त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. मंगळवारी तो मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. बुधवारी मेरशी येथील विशेष (पीएमएलए) न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली.

क्रिप्टोकरन्सीद्वारे व्यवहारांचा पर्दाफाश
तपासात मधूपन देशभरातून कोकेन, चरस, एमडीएमए आणि केटामाइनसारखे अमली पदार्थ टपाल व खासगी कुरिअर सेवेद्वारे मागवत असल्याचे समोर आले. त्याच्या बँक खात्यात २०२२ पासून १.७५ कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याचेही आढळले. यात २१ लाख रुपये रोख होते. तपासादरम्यान त्याने 'यूएसडीटी' क्रिप्टोकरन्सीद्वारे दुबईला पैसे पाठविल्याचेही निष्पन्न झाले.

हेही वाचा
सर्व पहा