Home >> ताज्या बातम्या >> ‘वाळवी’ संबोधणाऱ्या सावईकरांनी माफी मागावी !

‘वाळवी’ संबोधणाऱ्या सावईकरांनी माफी मागावी !

पणजीतील आझाद मैदानात आंदोलन : राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांचा सहभाग


29 mins ago
‘वाळवी’ संबोधणाऱ्या सावईकरांनी माफी मागावी !

आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झालेले राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी गोवन वार्ता
पणजी : युवकांना ‘वाळवी’ म्हटल्याबाबत नरेंद्र सावईकर यांनी माफी मागावी, ‘नीट’ पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी आझाद मैदानात विविध संघटनांनी आंदोलन केले. यावेळी शंभरहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. आप, काँग्रेस पक्षांतील पदाधिकाऱ्यांसह विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता.
उपस्थित विद्यार्थिनीने सांगितले की, सरकार पेपर फुटीची जबाबदारी घेण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ आयोजित करतात. मात्र पेपर फुटीबाबत काहीच बोलत नाहीत. दुसरीकडे भाजपचे नेते युवकांना ‘वाळवी’ म्हणून त्यांचा अपमान करत आहेत. वास्तविक देशाला लागलेली खरी वाळवी भाजप आहे. भाजप नेते अशिक्षित असल्यानेच त्यांना परीक्षेचे महत्त्व माहिती नाही. पुढील निवडणुकीत भाजपला मस्तीची फळे नक्कीच मिळणार आहेत.
अन्य एका विद्यार्थी म्हणाला की, देशाच्या शिक्षण क्षेत्रात शिक्षणच गायब झाले आहे. युवा पिढी देशाचे भविष्य आहे. पेपर फुटी मुळे आमच्या भविष्याशी खेळ करण्यात आला आहे. याबाबत प्रश्न विचारणाऱ्या युवकांना पोलिसांकरवी मारहाण करण्यात आली. केंद्रीय मंत्र्यांनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा दिलाच पाहिजे. मंत्री देशाची, आमची सेवा करण्यासाठी आहेत, जनता त्यांची सेवा करण्यासाठी नाही हे लक्षात घ्यावे. आम्हाला वाळवी अथवा अन्य काहीही म्हटले तरी, आम्ही आमच्या हक्कासाठी लढत राहणार आहोत. जोपर्यंत उत्तरदायित्व स्वीकारले जात नाही तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही.
काँग्रेसचे नेते अमित पालेकर म्हणाले की, काही दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरून शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर सरकारने एफआयआर दाखल केली आहे. सरकार दडपण आणून आंदोलन बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र युवक मागण्या पूर्ण होईपर्यंत लढत राहतील. बुधवारी भाजपने काँग्रेस कार्यालयावर मोर्चा नेला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी अपशब्द वापरले. हाच भाजपचा खरा चेहरा आहे. काँग्रेस कार्यालयावर मोर्चा नेणाऱ्यांवर एफआयआर दाखल करणार का, हा खरा प्रश्न आहे.
सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी आंदोलन आयोजित करणाऱ्यांना अप्रत्यक्ष धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला. प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या, गोव्यातील युवक २०२७ मध्ये भाजपला जागा दाखवतील. युवकांना ‘वाळवी’ म्हणणाऱ्या सावईकरांनी माफी मागावी. भाजपचे सरकार असूनही त्यांना काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा न्यावा लागला, ही लज्जास्पद गोष्ट आहे.
आझाद मैदानाच्या चारही प्रवेशद्वारांवर तणाव
आझाद मैदानाच्या चारही प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात होते. मामलेदार दत्तप्रसाद तोरस्कर आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये काही काळ वाद झाला. गिरीश चोडणकर यांनी युवकांना मैदानातील आंदोलनात सहभागी होता येऊ नये यासाठीच दारे बंद केल्याचा आरोप केला. तोरस्कर यांनी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस तैनात असल्याचे सांगितले.