‘इंडिया’चे नेतेही सहभागी : राहुल गांधी, प्रियंका वाड्रा पोलिसांच्या ताब्यात

आंदोलन स्थळावरून विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना उचलून नेताना दिल्ली पोलीस.
गोवन वार्ता न्यूज डेस्क
नवी दिल्ली : पेपर लीक आणि ‘नीट’मधील गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात आक्रमक झालेल्या विरोधकांनी दिल्लीत आंदोलन छेडले. मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह प्रमुख नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. तीन तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली खासदार आणि वरिष्ठ नेत्यांनी संसद भवनाबाहेरून मोर्चा काढत पंतप्रधान निवासाकडे मार्गक्रमण केले. या मोर्चात ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांचे नेते सहभागी झाले होते. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव पक्षाच्या खासदारांसह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. कार्यकर्त्यांची गर्दी आणि सुरक्षा यंत्रणांचा फौजफाटा यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी तातडीने आधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले. प्रियंका गांधी वाड्रा यांना ताब्यात घेताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
केंद्रातील मोदी सरकार भित्रे आहे. ते घाबरलेले आहेत, म्हणूनच दडपशाहीचा वापर करत आहे. पण आम्ही त्यांना अजिबात घाबरत नाही.
_ प्रियंका गांधी वाड्रा, सरचिटणीस, काँग्रेस
ही क्रांती देशात पसरणार : रणदीप सुरजेवाला
काँग्रेस खासदार रणदीप सिंग सुरजेवाला पत्रकारांशी बोलताना म्हणाले, हा या आंदोलनाचा शेवट नसून राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली एका नव्या क्रांतीची सुरुवात झाली आहे. सरकार आम्हाला तुरुंगात टाकू शकते, आमच्यावर लाठीचार्ज करू शकते; परंतु पेपर लीकमुळे ज्या लाखो तरुण-तरुणींचे भविष्य उद्ध्वस्त झाले, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदींना द्यावीच लागतील. ही क्रांती आता संपूर्ण देशात पसरणार आहे.
राहुल गांधींनी शब्द फिरवल्याचा जितेंद्र सिंह यांचा दावा
केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले की, विरोधी पक्ष नेते अचानक रस्त्यावर आंदोलनाला बसले होते. नेत्यांची प्रतिष्ठा लक्षात घेऊन गृहसचिव गोविंद मोहन आणि मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलो होतो. राहुल गांधी म्हणाले होते, सरकारने संसदेत ‘नीट’च्या मुद्द्यावर सविस्तर चर्चेची मागणी मान्य केली, तर ते आंदोलन मागे घेतील. आम्ही संसदेत सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, मागणी मान्य होताच त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची नवीन अट ठेवली. जेव्हा त्यांना सांगितले की, अशा प्रकारे भूमिकेपासून मागे हटणे वरिष्ठ नेत्याला शोभत नाही, तेव्हा त्यांनी ‘ती माझी मर्जी आहे’, असे बेजबाबदार उत्तर दिले.
मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त
सध्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील हाय-सिक्युरिटी झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, ताब्यात घेतलेल्या काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नेण्यात आले आहे.