Home >> ताज्या बातम्या >> अनियमित पावसामुळे चिंतेचे वातावरण कायम

अनियमित पावसामुळे चिंतेचे वातावरण कायम

भात लावणी लांबणार : राज्यातील केवळ २५ टक्के क्षेत्रावरच लावणी पूर्ण


18 hours ago
अनियमित पावसामुळे चिंतेचे वातावरण कायम

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या पावसानंतर दोन दिवस पावसाचे प्रमाण पुन्हा कमी झाले. अनियमित पावसामुळे भात लावणीच्या कामाला आणखी विलंब होण्याची भीती व्यक्त होत आहे. पाऊस पडण्यात सातत्य नसल्याने शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये अजूनही चिंतेचे वातावरण आहे. राज्यातील केवळ २५ टक्के क्षेत्रावरच भात लावणी पूर्ण झाली असून, लावणीनंतरही नियमित पाऊस पडणे आवश्यक आहे, अशी माहिती कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.
ते म्हणाले की, यंदा पावसाचे प्रमाण कमी तर आहेच, शिवाय तो अत्यंत अनियमित आहे. भाताची लावणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्यास रोपे सुकून पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून पावसाला सुरुवात झाली होती; मात्र शनिवार, रविवारी पावसाचे प्रमाण कमी होते. हीच परिस्थिती पुढे कायम राहिल्यास शेतीचे नुकसान होऊ शकते. आतापर्यंत राज्यातील फक्त २५ टक्के क्षेत्रावर लावणी झाली आहे. सखल भागातील शेतांमध्ये लावणी पूर्ण झाली असली तरी डोंगराळ भागातील शेतांमध्ये लावणी सुरू झालेली नाही. नियमित पावसाला सुरुवात होईपर्यंत लावणी करू नये, असा सल्ला कृषी खात्याने शेतकऱ्यांना दिला होता. गुरुवार आणि शुक्रवारी पाऊस झाला; मात्र त्यानंतर पुन्हा पावसाचे प्रमाण घटल्याने समस्या निर्माण झाली आहे.
सखल भागातील शेतांमध्ये पाणी साचून राहते. तसेच काही भागांत ओढे किंवा पाटांद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध असते. मात्र, डोंगराळ भागात पाणी साठत नाही आणि पर्यायी सिंचनाचीही व्यवस्था नसल्याने त्या भागातील शेतीसाठी सातत्याने पाऊस पडणे अत्यावश्यक आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने तरवा उशिरा तयार झाला. पावसाने दडी मारल्यामुळे लावणीला विलंब झाला असून हा विलंब आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.