सोने तस्करी रॅकेटचा पर्दाफाश : दोघांना अटक; गुन्हा शाखेची कारवाई

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने दुबईहून गोवामार्गे केरळला द्रवरूप सोने (लिक्विड गोल्ड) तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत १ कोटी ५० लाख रुपये किमतीचे १.३०० किलो सोने जप्त केले. या प्रकरणी हसन नियाझ (३५) आणि मोहम्मद खुन्ही (५७, केरळ) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कारवाईसाठी त्यांना आणि जप्त केलेले सोने सीमाशुल्कच्या (कस्टम) स्वाधीन करण्यात येणार आहे.
गुन्हा शाखेला मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या कतार एअरवेजच्या दुबईहून आलेल्या विमानातून सोन्याची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या नेतृत्वाखालील निरीक्षक निखिल पालेकर, हवालदार जयेश तारी, कॉन्स्टेबल संदेश वळवईकर, दत्तात्रय शेट वेर्णेकर, सुभा गावकर आणि जतीश नाईक या पथकाने शनिवारी पहाटे सुकेकुळण-धारगळ येथे सापळा रचला.
जॅकेट, अंतर्वस्त्रात बनवले होते विशेष खिसे
संबंधित विमान मोपावर उतरल्यानंतर तेथून बाहेर पडलेले संशयित हसन नियाझ आणि मोहम्मद खुन्ही हे दोघे गोवामार्गे केरळला जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून झडती घेतली असता, हसन नियाझ याने परिधान केलेल्या जॅकेट, बनियान आणि अंतर्वस्त्रांमध्ये अमली पदार्थ किंवा सोने लपवण्यासाठी विशेष खिसे तयार केल्याचे आढळून आले. या खिशांमध्ये लपवून आणलेले १.३ किलो वजनाचे द्रवरूप सोने पोलिसांनी हस्तगत केले, ज्याचे बाजारमूल्य दीड कोटी रुपये आहे.
दुबईहून तस्करी, केरळमध्ये डिलिव्हरीचा कट
तपासात हसन नियाझ हा दुबईहून कतार एअरवेजच्या विमानाने मोपा विमानतळावर आला होता, तर मोहम्मद खुन्ही हा केरळहून रेल्वेने मडगावमार्गे मोपा येथे सोन्याची डिलिव्हरी घेण्यासाठी पोहोचल्याचे उघड झाले. विमानतळावर सोन्याची देवाणघेवाण झाल्यानंतर दोघेही केरळकडे रवाना होत असताना धारगळ येथे गुन्हा शाखेने त्यांना अडवले.
कस्टमकडे सोपविणार पुढील तपास
गुन्हा शाखेने दोघांना प्रतिबंधक ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण कारवाईची माहिती सीमाशुल्क विभागाला देण्यात आली आहे. जप्त केलेले द्रवरूप सोने आणि दोन्ही संशयितांना पुढील तपासासाठी कस्टम विभागाच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.