मेरशी सत्र न्यायालयात सुनावणी; १२५ साक्षीदारांचे जबाब नोंद

पणजी : बार्देश तालुक्यातील पिर्ण येथील अष्टगंधा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमध्ये झालेल्या ११ कोटी २८ लाख ९३ हजार २१३ रुपयांच्या अफरातफर प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओसी) ८ माजी संचालकांविरोधात मेरशी येथील सत्र न्यायालयात ३,६३८ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात १२५ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
या प्रकरणात प्रकाश कांदोळकर, दिगंबर परब, मोहनदास देसाई, श्रद्धा नाईक, प्रकाश एल. नाईक, प्रकाश व्ही. नाईक, प्रकाश ए. नाईक आणि कृष्णा हळर्णकर यांचा समावेश आहे. तर रवींद्र नाईक, चंद्रशेखर बर्वे आणि भारत परब यांचे निधन झाल्याने त्यांची नावे वगळण्यात आली आहेत.
या घोटाळ्याप्रकरणी पतसंस्थेच्या प्रशासक समितीचे अध्यक्ष मंगेश फडते यांनी ईओसीकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. १४ जुलै २०२३ पूर्वी अस्तित्वात असलेल्या माजी संचालक मंडळाने पतसंस्थेच्या निधीतून अनधिकृतपणे तब्बल ११ कोटी २८ लाख ९३ हजार २१३ रुपये काढून ते स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केल्याचे या तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेत ईओसीचे पोलीस उपनिरीक्षक परेश रामनाथकर यांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
तपासानंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर
तपासादरम्यान प्रकाश एल. नाईक, कृष्णा हळर्णकर, प्रकाश व्ही. नाईक आणि प्रकाश ए. नाईक यांना अटक करण्यात आली होती. त्यांना नंतर सशर्त जामीन मिळाला. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर प्रकाश कांदोळकर यालाही अटक करण्यात आली, तर दिगंबर परब आणि मोहनदास देसाई यांनाही ईओसीने ताब्यात घेतले. सध्या हे तिघे न्यायालयीन कोठडीत असून, श्रद्धा नाईक यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तपास पूर्ण करून ईओसीने आता न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे.