मुख्य निवडणूक आयुक्त : ७५ टक्के प्रक्रिया पूर्ण

नवी दिल्ली : देशभरात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेपैकी सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली. भारताने राबविलेल्या एसआयआर प्रक्रियेचा अभ्यास करून इतर देशही अशा प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्ली येथील भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्था येथे आयोजित अखिल भारतीय माध्यम परिषदेत देशभरातून आलेल्या पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ज्ञानेश कुमार म्हणाले, एसआयआर प्रक्रियेच्या माध्यमातून अनुपस्थित, बनावट, मृत, परदेशात स्थायिक किंवा स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून पद्धतशीररीत्या वगळण्याची प्रभावी प्रणाली भारताने विकसित केली आहे. अशा प्रकारची व्यापक प्रक्रिया राबविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.
मतदार यादी अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी निवडणूक आयोगाने देशभरातील १२ लाख बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) तसेच विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल एजंटांचा (बीएलए) सहभाग घेतला आहे. या संपूर्ण प्रक्रियेला कायदेशीर संरक्षण असून, परस्पर पडताळणीच्या माध्यमातून मतदार यादी तयार केली जात असल्याचे ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रक्रियेच्या घटनात्मक वैधतेला मान्यता दिल्यानंतर दोन वर्षांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर या ऐतिहासिक मोहिमेतील ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. भारताच्या या प्रणालीची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली जात असून, अमेरिकेतही नागरिकत्व पडताळणी आणि मतदानासाठी कठोर नियम असलेला ‘सेव्ह यूएस अॅक्ट’ या विधेयकावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
काही राजकीय पक्षांनी अद्याप आपल्या बीएलएंची नियुक्ती न केल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी मसुद्यावर राजकीय पक्षांना आक्षेप आणि सूचना नोंदविण्याची संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘एसआयआर’ प्रक्रियेचे निकष स्पष्ट
- भारतीय संविधानाच्या कलम ३२६ आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी स्पष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत.
- १९८७ पूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना भारताचे नागरिक मानले जाते आणि ऐतिहासिक २००३-२००४ च्या मतदार यादीत त्यांचे नाव असल्यास त्यांना थेट पात्रता मिळते.
- १९८७ ते २००४ या कालावधीत जन्मलेल्या नागरिकांच्या पालकांची नावे जर २००३-२००४ च्या ऐतिहासिक मतदार यादीत असतील, तर त्यांचे नाव अंतिम यादीत वैध ठरवले जाते.
- २००४ नंतर जन्मलेल्या नागरिकांना कायद्यातील अटी पूर्ण करून वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार म्हणून नोंदणी करता येते.
दर सेकंदाला तीन नवे मतदार
सध्या देशातील मतदारांची संख्या सुमारे ९५ कोटींच्या घरात असून, लोकसंख्यावाढीमुळे हा आकडा सातत्याने वाढत आहे. दरवर्षी सुमारे ८ कोटी नव्या मतदारांची नोंद होते. म्हणजेच दररोज सुमारे १.५२ लाख, तर दर सेकंदाला सरासरी तीन नव्या मतदारांची भर मतदार यादीत पडत असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली.