Home >> ताज्या बातम्या >> सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात केले दाखल

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात केले दाखल

२१ व्या दिवशीही उपोषण सुरूच : सलाईन, पाणी घेण्यास नकार

Story: गोवन वार्ता। न्यूज डेस्क |
18th July, 11:55 pm
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात केले दाखल

नवी दिल्ली : ‘नीट’ पेपर लीक प्रकरणाच्या चौकशीसाठी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या २१ दिवसांपासून उपोषणावर बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. शनिवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतर-मंतर येथील उपोषणस्थळावरून हटवून जबरदस्तीने सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या प्रकृतीची तपासणी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार करण्यात आली असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

सफदरजंग रुग्णालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, सोनम वांगचुक यांनी सलाईन अथवा तोंडाने कोणत्याही प्रकारचा द्रव पदार्थ घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, वांगचुक यांची नाडी, रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी सध्या स्थिर असली, तरी शरीरातील पाण्याच्या कमतरतेची गंभीर लक्षणे त्यांच्यात दिसून येत आहेत. त्यांच्या आरोग्याचा विचार करता डॉक्टर त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून असून, त्यांना उपचार घेण्याबाबत वैद्यकीय सल्ला दिला जात आहे.

पोटॅशियमची पातळी घटल्याने, जिवाला धोका

सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सोनम यांच्या शरीरातील पोटॅशियमची पातळी अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. कालपर्यंत ४.३ वर असलेली पोटॅशियमची पातळी आता थेट २.९ वर आली असून, यामुळे त्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती येथील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

आम्हाला न सांगताच मध्यरात्री उचलले

प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेताना गीतांजली म्हणाल्या, सोनम यांना जंतर-मंतरवरून रुग्णालयात आणण्यापूर्वी त्यांना किंवा मला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. शुक्रवारी संध्याकाळीच सफदरजंग रुग्णालयाच्या डॉक्टरांनी उपोषणस्थळी त्यांची तपासणी केली होती, तेव्हा त्यांचे सर्व आरोग्य निकष सामान्य होते. मग अचानक रात्री अशी कारवाई का करण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पूर्वनियोजित मोर्चा निघणारच!

सोनम वांगचुक यांच्यावर जबरदस्तीने रुग्णालयात उपचार सुरू केले तरी आमचे आंदोलन थांबणार नाही. जर सोनम या मोर्चात सहभागी होऊ शकले नाहीत, तर त्यांच्या अनुपस्थितीत मी स्वतः या मोर्चाचे नेतृत्व करेन. सोमवारचा नियोजित मोर्चा ठरलेल्या वेळेनुसार आणि नियोजनानुसार पार पडेल, असेही गीतांजली म्हणाल्या.

मी सध्या दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात आहे, जिथे सोनम वांगचुक यांना दाखल करण्यात आले आहे. जोपर्यंत माझी, त्यांच्या कुटुंबाची आणि गेल्या २० दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांची सहमती घेतली जात नाही, तोपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचे औषध किंवा द्रव पदार्थ दिले जाऊ नये. - गीतांजली जे. अंगमो, वांगचुक यांच्या पत्नी

अभिजीत दीपके यांच्यावर शाईफेक

वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर आंदोलन मागे न घेता ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दीपके स्वतः उपोषणाला बसले. ते मंचावरून खाली येऊन बसले असता, एका अज्ञात महिलेने त्यांच्यावर अचानक शाई फेकली. यामुळे जंतर-मंतरवर एकच गोंधळ उडाला. तेथे उपस्थित कार्यकर्त्यांनी तातडीने त्या महिलेला पकडले. या कृत्यामागचा तिचा हेतू आणि तिची ओळख अद्याप पटलेली नाही.

माझी सोनम सरांशी चर्चा झाली असून, त्यांना रुग्णालयात डांबून ठेवण्यात आले आहे, त्यांना परत जंतर-मंतरवर यायचे आहे. ते जोपर्यंत परत येत नाहीत, तोपर्यंत मी मंचावर जाणार नाही. - अभिजीत दीपके, कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख