Home >> ताज्या बातम्या >> दीर्घ विश्रांतीनंतर पावसाने झोडपले; अनेक ठिकाणी पूरस्थिती

दीर्घ विश्रांतीनंतर पावसाने झोडपले; अनेक ठिकाणी पूरस्थिती

सत्तरीतील जनजीवन विस्कळीत : साखळीत वाळंवटीला पूर


17th July, 11:50 pm
दीर्घ विश्रांतीनंतर पावसाने झोडपले; अनेक ठिकाणी पूरस्थिती

पाली-सत्तरी येथील श्री दत्त मंदिराच्या सभोवताली पडलेला पाण्याचा वेढा.
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी/वाळपई/साखळी/फोंडा : जुलैच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतलेल्या मान्सूनने गुरुवारी रात्रीपासून पुन्हा जोर धरला. सत्तरी आणि सांगे तालुक्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. वेळूस नदीचे पाणी कुळागरांत शिरले. मुरमुणे–गुळेली येथे रस्ते पाण्याखाली गेले. सांगे आणि वाळपई येथे २४ तासांत पाच इंचांहून अधिक पावसाची नोंद झाली. वाळपई, सांगे आणि केपे वगळता राज्यातील इतर भागांत पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहिले. मात्र, सर्वच भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली असून शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला. २४ तासांत राज्यात सरासरी १.६४ इंच, तर आतापर्यंत ३७.६५ इंच पाऊस झाला. अद्यापही पाऊस सरासरीपेक्षा ३६.३ टक्के कमी आहे.
सत्तरी तालुक्यात गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या आणि शुक्रवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले. अनेक रस्ते पाण्याखाली गेले. वेळूस, रगाडा, वाळवंटी, म्हादईसह सर्व प्रमुख नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. अंजुणे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून तो २६ टक्क्यांवर पोहोचला आहे. ठाणे ग्रामपंचायत क्षेत्रातील पाली येथे वेळूस नदीच्या काठावर असलेल्या प्रसिद्ध श्री दत्तात्रेय मंदिराला शुक्रवारी सकाळी नदीच्या पाण्याने वेढा घातला. मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत नदीचे पाणी पोहोचले. मंदिराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने भाविकांना मंदिरात प्रवेश करता आला नाही. सुमारे दोन-तीन तासांनंतर नदीचे पाणी ओसरले.
गुळेली–मुरमुणे रस्ता पाण्याखाली; वाहतूक ठप्प
गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील गुळेली ते मुरमुणे रस्ता काही काळ रगाडा नदीच्या पाण्याखाली गेला. त्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. गुळेली, शेळ मेळावली, धडा, पैकुळ भागातील नागरिकांची गैरसोय झाली. गुळेली येथील सरकारी माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. अनेक ठिकाणी भातशेती, भाजीपाला, काजू, सुपारी व आंब्याच्या लागवडीमध्ये पाणी शिरले. काही भागांत नुकसान झाल्याची माहिती आहे.
प्रशासन सतर्क; नियंत्रण कक्ष कार्यान्वित
सततच्या पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. सत्तरीचे उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत कुर्टीकर, मामलेदार धीरेंद्र बाणावलीकर आणि संयुक्त मामलेदार विष्णू राणे यांनी संबंधित विभागांशी सातत्याने संपर्क ठेवला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. वाळपई येथील मामलेदार कार्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाळवंटीला पूर; साखळी बाजारातील पंप सुरू
गुरुवार, शुक्रवारी झालेल्या पावसाने साखळीतील वाळवंटी नदीला पूर आला. सकाळी ११ च्या सुमारास भरती असल्याने पाणी नदीत तुंबून राहिले. बंदिरवाडा विठ्ठलापूर येथील श्री देव तोणयेश्वराच्या पेडाला पाण्याने वेढा घातला होता. काजीवाडा येथे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. साखळी बाजारातील नाल्याची पाणी पातळी पावणेतीन मीटर झाल्यानंतर पूरप्रतिबंधक योजनेतील पंप सुरू करून नाल्यातील पाणी नदीत फेकण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. संध्याकाळपर्यंत नदीची पाणी पातळी नियंत्रणात आली.
रगाडा नदीला पूर आल्याने दोन पूल पाण्याखाली
साकोर्डा भागातील रगाडा नदीला पूर आल्याने शुक्रवारी सकाळपासून देऊळमळ येथील दोन जुने पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे तांबडीसुर्ला येथील महादेव मंदिरात जाणारे पर्यटक पुलाजवळ अडकून पडले. या मार्गांवरील वाहतूक बाराभूमी मार्गाने वळविण्यात आली. दुपारी ३ वाजल्यानंतर पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पुलावरून वाहतूक सुरू झाली. कुळे पोलिसांनी दोन्ही पुलाजवळ स्थितीवर लक्ष ठेवले. मधलावाडा साकोर्डा येथे नवीन बांधलेल्या पुलाचा जोड रस्ता पावसात खचून गेला. स्थानिकांनी वाहन चालकांना सावध करण्यासाठी जोड रस्त्यावर झाडे लावली आहेत.