Home >> ताज्या बातम्या >> राज्यात फक्त वेळसावमध्येच भातपिकाचे नुकसान

राज्यात फक्त वेळसावमध्येच भातपिकाचे नुकसान

अधिकाऱ्यांकडून पाहणी; शेतकऱ्यांना मार्गदर्शक सूचना


29 mins ago
राज्यात फक्त वेळसावमध्येच भातपिकाचे नुकसान

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : सध्या सुरू असलेल्या कोरड्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कृषी खात्याच्या विभागीय अधिकाऱ्यांनी राज्यातील भात शेतीची पाहणी केली असून, वेळसाव वगळता इतर कोणत्याही भागात भात पिकाचे नुकसान झाल्याचे आढळलेले नाही, अशी माहिती कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली. मात्र, वेळसाव येथे शेतात खारे पाणी शिरल्याने भात पिकाचे नुकसान झाले आहे. पावसाच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
देसाई पुढे म्हणाले की, पुढील चार दिवसांत पाऊस झाला नाही तर भात उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. पिकांचे नुकसान झाल्यास कृषी विभाग नुकसानभरपाई देण्यास तयार आहे. यासाठी विभागीय कृषी अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. राज्यातील विभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, सध्याच्या कोरड्या हवामानामुळे बहुतांश भागांत भात पिकाचे नुकसान झालेले नाही. मात्र, ज्या भागांत सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, तेथे भात पेरणीच्या कामात विलंब होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मुरगाव तालुक्यातील वेळसाव येथे सुमारे २ हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे नुकसान झाले. पावसाअभावी शेतांतील खाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. सध्याच्या परिस्थितीवर कृषी संचालनालय बारकाईने लक्ष ठेवून आहे. हवामानाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांना पुढील मार्गदर्शन आणि तांत्रिक सल्ला देण्यात येणार आहे.
कृषी संचालकांकडून मार्गदर्शक सूचना
पावसाच्या कमतरतेमुळे अनेक भागांत भात पिकाला खताचा पहिला डोस देण्यास विलंब झाला आहे. पुरेसा पाऊस झाल्यानंतर किंवा सिंचनाची व्यवस्था उपलब्ध झाल्यानंतरच खतांचा वापर करावा.
ज्या शेतांमध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, तेथे आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. ज्या शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झाली आहे, त्यांनी शक्य असल्यास शेतात २ ते ५ सेंटीमीटर पाण्याची पातळी कायम ठेवावी.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पेरणी केलेली नाही, त्यांनी पुरेसा पाऊस होईपर्यंत किंवा सिंचनाची व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत पेरणी पुढे ढकलावी. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी शेताचे बांध मजबूत करावेत. पाण्याचा अपव्यय टाळावा.
कोरड्या हवामानात रासायनिक खतांचा वापर करू नये. पुरेसा पाऊस पडल्यानंतर किंवा सिंचनानंतरच खतांचा वापर करावा.
नुकसानभरपाई देण्यास सरकार तयार : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, कृषी संचालनालयाने परिपत्रक जारी करून सर्व शेतांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. विभागीय कृषी अधिकारी राज्यभर पाहणी करून अहवाल सादर करतील. या अहवालात पिकांचे नुकसान झाल्याचे आढळल्यास पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा