न विकल्या गेलेल्या प्लॉट्सचा साठा; विकासकांची विक्रीला चालना

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : उत्तर गोव्यातील प्रीमियम निवासी मालमत्तांच्या किमतींमध्ये २०२६ च्या पहिल्या सहामाहीत वार्षिक सुमारे ४ ते ६ टक्क्यांनी घट झाली आहे. रिअल इस्टेट सल्लागार संस्था साविल्स इंडियाच्या अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत झालेल्या दरवाढीनंतर बाजारदरात आता कपात झाल्याचे दिसून आले आहे.
या अहवालानुसार, दुसरे घर खरेदी करणारे ग्राहक, उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदार आणि इतर गुंतवणूकदार यांच्या वाढत्या मागणीमुळे उत्तर गोव्यातील मालमत्तांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. मात्र आता बाजारात मोठ्या प्रमाणावर न विकल्या गेलेल्या प्लॉट्सचा साठा उपलब्ध असल्याने अनेक विकासकांनी विक्रीला चालना देण्यासाठी किमतींमध्ये कपात दाखवण्यास सुरुवात केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, ही घसरण बाजारातील मोठ्या संकटाचे लक्षण नसून, गेल्या काही वर्षांतील झालेल्या असामान्य दरवाढीनंतरची ही नैसर्गिक किंमत दुरुस्ती आहे. दीर्घकालीन दृष्टीने पायाभूत सुविधा विकास आणि पर्यटनामुळे उत्तर गोव्याच्या रिअल इस्टेट बाजारात संधी कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
विकसित भागांतही चांगला प्रतिसाद
निवासी मालमत्तांची मागणी केवळ पारंपरिक किनारी भागांपुरती मर्यादित न राहता मयडे, नेरूल यांसारख्या नव्याने विकसित होत असलेल्या भागांकडेही वळत आहे. तुलनेने कमी घनतेचा परिसर, मोठे प्लॉट आणि परवडणाऱ्या किमती यामुळे या भागांना खरेदीदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.