Home >> ताज्या बातम्या >> भातासाठी पुढील चार दिवसांत पाऊस गरजेचा

भातासाठी पुढील चार दिवसांत पाऊस गरजेचा

पाऊस न झाल्यास उत्पादन घटण्याची शक्यता; नुकसानभरपाईसाठी कृषी विभाग सज्ज


10 mins ago
भातासाठी पुढील चार दिवसांत पाऊस गरजेचा

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : राज्यात पावसाच्या कमतरतेमुळे भात शेतीवर परिणाम होण्याची शक्यता असून, पुढील चार दिवसांत पाऊस पडला नाही तर भाताचे उत्पादन घटणे निश्चित आहे, असे कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी सांगितले. पिकांचे नुकसान झाल्यास कृषी विभाग शेतकरी आधार निधीतून नुकसानभरपाई देण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जुलै महिन्याच्या मध्यातच पावसाने दडी मारली असून, पुढील आठवडाभरही पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी पाऊस झाला आहे. गोव्यात भात लागवडीची कामे वेगाने सुरू असली तरी या पिकासाठी सातत्याने पाऊस आवश्यक असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत माहिती देताना कृषी संचालक देसाई म्हणाले की, गोव्यात भात लागवड प्रामुख्याने दोन पद्धतींनी केली जाते. एक म्हणजे थेट शेतात बियाण्यांची पेरणी आणि दुसरी म्हणजे रोपवाटिकेतील रोपांची पुनर्लागवड. सध्या केवळ ५ ते १० टक्के क्षेत्रावर रोपांची पुनर्लागवड झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी रोपे लावली आहेत आणि पर्यायी पाण्याची व्यवस्था आहे, त्यांना पंपाद्वारे पाणी देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे अशी सुविधा नाही, त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. ओलावा टिकून असलेल्या शेतांमध्ये पेरलेले बियाणे सुरक्षित असले तरी पाणी नसलेल्या शेतांतील बियाण्यांवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
विभागीय कृषी अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, ते बुधवारी अहवाल सादर करणार आहेत. पुढील चार दिवसांत पाऊस झाला नाही तर भात उत्पादनात घट होईल. त्यामुळे या कालावधीत किमान एक जोरदार पाऊस होणे अत्यावश्यक आहे. अहवालात बियाणे किंवा रोपांचे नुकसान झाल्याचे आढळल्यास शेतकरी आधार निधीतून नुकसानभरपाई दिली जाईल, असे देसाई यांनी सांगितले.
केपे येथील शेतकरी तथा माजी कृषी अधिकारी सत्यवान देसाई यांनी सांगितले की, सखल भागातील शेतांमध्ये पाण्याची उपलब्धता असल्याने तेथील पिकांवर फारसा परिणाम होणार नाही. मात्र, डोंगराळ भागातील शेती कोरडी पडू लागली आहे. सासष्टीसारख्या सखल भागात शेतीची कामे सुरू असून तेथील पाण्याची पातळी स्थिर आहे. त्यामुळे तेथील भात पिकावर मोठा परिणाम होणार नाही. सासष्टीत बहुतांश ठिकाणी लावणी पूर्ण झाली असून पावसामुळे बियाणे उगवण्याचे प्रमाण ५० ते ६० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, केपे, काणकोण आणि सांगे या डोंगराळ भागांमध्ये शेतीची कामे ठप्प झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी रोपांची लागवड सुरू केली होती. पेरणीसाठी जमीनही तयार केली होती. मात्र, शेतात पाणी नसल्याने पुढील कामे थांबली आहेत. या भागांतील ओढेही आटल्यामुळे रोपे सुकण्याची वेळ आली आहे.
पुढील चार दिवस महत्त्वाचे
कृषी खात्याच्या प्राथमिक आढाव्यानुसार पुढील चार दिवसांत किमान एक चांगला पाऊस झाला, तर अनेक भागांतील भात पीक वाचू शकते. अन्यथा रोपांची वाढ खुंटण्याची शक्यता आहे. उत्पादनात घट होण्याची भीती असून काही भागांत पुन्हा पेरणीची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे भात पिकाच्या दृष्टीने पुढील चार दिवसांत पाऊस होणे आवश्यक आहे.
राज्यात फक्त ५ ते १० टक्के क्षेत्रात रोपांची लावणी पूर्ण
राज्यातील भात लागवडीपैकी फक्त ५ ते १० टक्के क्षेत्रात रोपांची लावणी पूर्ण झाली आहे. उर्वरित क्षेत्रांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे लागवडीचे काम मंदावले आहे. थेट बियाणे पेरणी आणि रोपांची पुनर्लागवड पद्धतीद्वारे भाताचे उत्पादन घेतले जाते. जमिनीत ओलावा असेल तर बियाणे सुरक्षित राहतील. पर्यायी पाण्याची सोय असलेल्या शेतांना तुलनेत धोका कमी आहे. ४ दिवसांत चांगला पाऊस झाल्यास उत्पादनावर मर्यादित परिणाम होऊ शकतो. हलका पाऊस झाल्यास उत्पादनात काही प्रमाणात घट होईल. पाऊस झालाच नाही तर मात्र उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.
कृषी खाते पाहणी करून देणार अहवाल
पावसाने बरीच ओढ दिल्याने कृषी खातेही सक्रिय झाले आहे. विभागीय कृषी अधिकाऱ्यांना क्षेत्रनिहाय पाहणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. पाहणीनंतर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. बियाणे किंवा रोपांचे नुकसान झाल्यास तातडीने पंचनामे केले जातील. नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित शेतकऱ्यांना ‘शेतकरी आधार निधी’अंतर्गत नुकसानभरपाई देण्याची व्यवस्था केली जाईल.
डोंगराळ भागातील शेतीला धोका अधिक
सध्याच्या परिस्थितीत गोव्यातील भात शेती पुढील चार दिवसांत होणाऱ्या पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. सासष्टीसारख्या खालच्या भागात धोका तुलनेने कमी असला, तरी केपे, काणकोण आणि सांगे या डोंगराळ भागांतील भात शेतीला तातडीने पावसाची आवश्यकता आहे.

हेही वाचा
सर्व पहा