Home >> ताज्या बातम्या >> गोमेकॉमध्ये एमबीबीएसच्या ५० अतिरिक्त जागांना मंजुरी

गोमेकॉमध्ये एमबीबीएसच्या ५० अतिरिक्त जागांना मंजुरी

प्रवेशक्षमता आता २५० विद्यार्थ्यांपर्यंत : गोव्यातील तरुणांसाठी नव्या संधी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th July, 09:41 pm
गोमेकॉमध्ये एमबीबीएसच्या ५० अतिरिक्त जागांना मंजुरी

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून (एनएमसी) गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) एमबीबीएसच्या ५० अतिरिक्त जागांना अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून महाविद्यालयाची प्रवेशक्षमता २०० वरून २५० विद्यार्थ्यांपर्यंत वाढणार आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी वाढल्या संधी

या विस्तारामुळे वैद्यकीय शिक्षणाची आकांक्षा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः गोव्यातील तरुणांसाठी अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच, राज्यातील वैद्यकीय शिक्षण व्यवस्था आणि आरोग्यसेवेतील मनुष्यबळ अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी सातत्याने सहकार्य केल्याबद्दल राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

सन २०१९ पूर्वी गोमेकॉमध्ये एमबीबीएसच्या १८० जागा होत्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण लागू केल्यानंतर २०१९ मध्ये ही संख्या २०० करण्यात आली. त्यानंतर २०२३ मध्ये आरोग्य खाते आणि डीन कार्यालयाने पदवी व पदव्युत्तर शिक्षण क्षमता वाढविण्यासाठी व्यापक आराखडा तयार केला. गोव्यातील विद्यार्थ्यांना उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी राज्याबाहेर जावे लागू नये, यासाठी एमबीबीएसच्या जागांमध्ये २५ टक्के वाढ करण्याबरोबरच सुपर-स्पेशालिटी आणि क्रिटिकल केअर शाखा सुरू करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले होते.

वैद्यकीय शिक्षणाला नवी चालनाएमबीबीएसच्या अतिरिक्त ५० जागांमुळे गोव्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होणार असून, भविष्यात राज्यातील डॉक्टरांची संख्या वाढण्यास आणि आरोग्यसेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
पाठपुरावा अन् केंद्रीय मंत्र्यांची भेट

ऑगस्ट २०२५ मध्ये आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी विधानसभेत एमबीबीएसच्या जागा २०० वरून २५० करण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे पाठवल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन मंजुरी प्रक्रियेला गती देण्याची विनंती केली होती. गोव्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी हा निर्णय किती महत्त्वाचा आहे, हे त्यांनी या बैठकीत अधोरेखित केले होते.

प्रमुख राष्ट्रीय संस्थांच्या श्रेणीत

१) राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आणि पायाभूत सुविधांच्या प्रत्यक्ष तपासणीनंतर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अखेर २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ५० अतिरिक्त एमबीबीएस जागांना मंजुरी दिली.

२) या विस्तारामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाची वार्षिक प्रवेशक्षमता २५० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असून, देशातील अधिक क्षमतेच्या प्रमुख सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या श्रेणीत गोमेकॉचा समावेश झाला आहे.