पणजी : कारापूर सर्वण येथील बांधकाम प्रकल्पाच्या विरोधात स्थानिकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला सोमवारी शंभर दिवस पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर काही आंदोलकांनी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू केले असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी आझाद मैदानावरही निदर्शने करण्यात आली.
यावेळी स्थानिकांसह राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. जोपर्यंत या बांधकाम प्रकल्पाला स्थगिती मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
भाजप सरकारने गोव्याची विक्री सुरू केली असून, नगर नियोजन कायद्यात बदल करून येथील जमिनी दिल्लीतील लोकाщих घशात घातल्या जात आहेत. गोव्याला वाचवण्यासाठी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
आज राज्यातील जनतेने पेटून उठणे आवश्यक असून, हा प्रकल्प पूर्ण झाला तर गोव्यासाठी व येथील लोकांसाठी तो खूप मोठा पराभव ठरेल. सर्वांनी कारापूरवासीयांना पाठिंबा दिला पाहिजे. गरज पडल्यास माझ्या मतदारसंघातील लोक आठवड्यातून दोन वेळा प्रकल्पस्थळी जाऊन आंदोलकांना पाठिंबा देतील, असे आमदार वेंजी व्हिएगस यांनी सांगितले.
या प्रकल्पात अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. सुमारे ५ लाख चौरस मीटर क्षेत्रात येणाऱ्या या प्रकल्पाच्या ठिकाणी अवैधपणे कुंपण घालण्यात आले असून, स्थानिकांना त्यांच्या शेतात जाण्यासही मज्जाव केला जात आहे. हा प्रकल्प रद्द न केल्यास ती येथील भाजप सरकारच्या शेवटाची सुरुवात ठरेल. मागील ४० वर्षांतील सर्वांत् भ्रष्ट राजकीय निर्णय घेऊन या प्रकल्पाला परवाने देण्यात आले आहेत, त्यामुळे सरकारने जनतेला मूर्ख समजणे बंद करावे, असे क्लॉड अल्वारिस यांनी सांगितले.


