ट्रक चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे झोप आल्याने वाहनावरील ताबा सुटल्याची प्राथमिक माहिती; वारीच्या मार्गावर कडक सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रण असतानाही घडला भीषण अपघात. प्रशासन अॅक्शन मोडमध्ये.

पुणे : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला एका भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोल नाक्यापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर, हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर हा भीषण अपघात झाला. या अपघातात सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य १६ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या दुर्घटनेमुळे संपूर्ण पालखी सोहळ्यावर आणि राज्यभरातील वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी रविवारी सासवड येथे मुक्कामी होती. सोमवारी सकाळी हा वैष्णवांचा मेळा जेजुरीच्या दिशेने पुढे निघाला. वारकऱ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक सुरू ठेवली होती. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिशीकर यांच्या दिंडीचा ट्रॅक्टर आणि सांगली जिल्ह्यातील कासबे डिग्रज येथील दिंडीतील वारकरी जेजुरीजवळील परिसरात पोहोचले असता, मागून आलेल्या एका अनियंत्रित ट्रकने त्यांच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, वाहनाचा चक्काचूर झाला आणि अनेक वारकरी या धडकेच्या तडाख्यात आले. अपघातानंतर परिसरात एकच आक्रोश आणि गोंधळ उडाला.

तापाच्या गोळ्यांमुळे चालकाला ग्लानी आल्याची प्राथमिक माहिती
प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक चालकाला ताप आलेला होता आणि त्याने तापाच्या गोळ्या घेतल्या होत्या. या औषधांमुळे त्याला झोप आली होती आणि त्यामुळेच त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातातील मृत महिला वारकरी या सांगली जिल्ह्यातील असून, राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे आणि नंदा पवार अशी या मृत वारकऱ्यांची नावे आहेत.
प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य; जखमींवर उपचार सुरू
अपघातानंतर स्थानिक नागरिक, वारकरी स्वयंसेवक आणि प्रशासनाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना तात्काळ जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालय आणि स्थानिक खाजगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तात्काळ जेजुरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच गंभीर जखमी असलेल्या महिला वारकऱ्यांच्या भेटीसाठी त्या खाजगी रुग्णालयाकडे रवाना झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुरक्षेचे कडक नियम लागू केलेले असतानाही हा अपघात नेमका कसा घडला, ट्रकचालकाचा निष्काळजीपणा की तांत्रिक बिघाड, याचा सखोल तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांकडून आता या प्रकरणाच्या अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.