आपण ज्या गोष्टीला साधना म्हणतो, ती म्हणजे तुमची ऊर्जा अशा पातळीवर उंचावण्याची एक संधी, ज्यामुळे तुम्ही या मर्यादांवर किंवा या यंत्रणांवर मात करू शकता, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला तुमच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये अडकवून घेतले आहे.

सद्गुरू : मनाचा स्वभाव नेहमीच संचय करण्याचा असतो. जेव्हा तो स्थूल स्वरूपात असतो, तेव्हा त्याला वस्तूंचा संचय करावासा वाटतो. जेव्हा तो थोडा अधिक विकसित होतो, तेव्हा त्याला ज्ञानाचा संचय करावासा वाटतो. जेव्हा भावना प्रबळ होतात, तेव्हा त्याला माणसांचा संचय करावासा वाटतो. परंतु त्याचा मूलभूत स्वभाव एकच असतो, तो म्हणजे संचय करणे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला असे वाटू लागते किंवा ती व्यक्ती असा विश्वास ठेवू लागते की, ती आध्यात्मिक मार्गावर आहे, तेव्हा त्या व्यक्तीचे मन तथाकथित आध्यात्मिक ज्ञानाचा संचय करू लागते. कदाचित ती व्यक्ती गुरूंच्या शब्दांचा संचय करू लागेल. मग तो अन्नाचा संचय असो, वस्तूंचा असो, माणसांचा असो, माहितीचा असो किंवा ज्ञानाचा असो - तुम्ही नेमका कशाचा संचय करत आहात, याला काही महत्त्व नाही, जेव्हा संचय करण्याची गरज निर्माण होते, तेव्हा त्याचा अर्थ इतकाच असतो की, तुमच्या आतमध्ये काहीतरी अपूर्णता आहे. ही अपूर्णता, अपुरे असल्याची भावना या अमर्याद अस्तित्वामध्ये फक्त यामुळे निर्माण झाली आहे की, कुठेतरी तुम्ही स्वतःला अशा मर्यादित गोष्टींशी जोडून घेतले आहे, ज्या प्रत्यक्षात तुम्ही नाही आहात.
जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या जीवनात पुरेशी जागरूकता आणली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्या व्यक्तीने सततची साधना, एखादा सराव सातत्याने जोपासला, तर मग हळूहळू हे पात्र पूर्णपणे रिक्त होऊ लागते. जागरूकता पात्र रिक्त करते. साधना पात्र शुद्ध करते. जागरूकता आणि साधना हे दोन्ही पैलू पुरेशा कालावधीपर्यंत सातत्याने जोपासले, तर तुमचे पात्र पूर्णपणे रिक्त होते. एकदा का हा रिक्तपणा निर्माण झाला, तरच कृपा तुमच्यावर बरसते. कृपेशिवाय खऱ्या अर्थाने कोणीही कुठेच पोहोचू शकत नाही. जर तुम्हाला कृपेचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुमचे पात्र पूर्णपणे रिक्त झाले पाहिजे. जर तुम्ही गुरूंसोबत केवळ त्यांचे शब्द गोळा करण्यासाठी राहत असाल, तर तुमचे जीवन हिवाळ्यासाठी किंवा पावसाळ्यासाठी अन्न साठवणाऱ्या मुंगीपेक्षाही अधिक व्यर्थ ठरेल.
जर तुम्ही कृपेचा अनुभव घेतला नाही, जर तुम्ही स्वतःला कृपेप्रति ग्रहणशील बनवले नाही, जर कृपा धारण करण्यासाठी तुम्ही स्वतःला रिक्त केले नाही, तर आध्यात्मिक मार्ग हा असंख्य जन्मांपर्यंत चालत राहणारा प्रवास ठरतो. परंतु जर तुम्ही कृपा अवतरण्याइतके रिक्त झालात, तर परम स्वरूप तुमच्यापासून दूर नाही. ते अनुभवण्यासाठी इथेच उपलब्ध आहे, ते साक्षात्कार होण्यासाठी इथेच उपलब्ध आहे. अस्तित्वाच्या सर्व आयामांच्या पलीकडे जाऊन त्या सर्वोच्च अवस्थेत पोहोचणे म्हणजेच परम स्वरूप. ते उद्या नसते, पुढच्या जन्मात देखील नसते. ते एक जिवंत वास्तव बनलेले असते.
कसे कोण जाणे, पण तुमच्यामध्ये अशी वृत्ती निर्माण झाली आहे की, तुम्ही जिथे जाल तिथून शक्य तितका अधिक संचय केला पाहिजे. यामागचा सर्वात मोठा कारणीभूत घटक म्हणजे तुमची शिक्षण व्यवस्था. तिने तुम्हाला नेहमीच अधिकाधिक पद्धतशीर रीतीने जास्तीत जास्त संचय कसा करायचा, हेच शिकवले. या संचयाच्या आधारे तुम्ही उपजीविका करू शकता. या संचयामुळे कदाचित तुमच्या सभोवतालच्या जीवनाची भौतिक गुणवत्ता काही प्रमाणात सुधारू शकते. पण तुम्ही कितीही संचय केला, मग तो वायफळ गप्पांचा असो, वैज्ञानिक माहितीचा असो किंवा तथाकथित आध्यात्मिक ज्ञानाचा असो तो संचय तुम्हाला मुक्त करण्यास समर्थ नाही. तो तुम्हाला परम स्वरूपाच्या एक इंचही जवळ नेऊ शकत नाही. आवश्यक अशी जागरूकता आणण्यासाठी आणि तुमचे पात्र सतत शुद्ध ठेवण्यासाठी साधना, म्हणजेच आंतरिक कार्य आवश्यक आहे. याला खरोखर कोणताही पर्याय नाही.
जर तुम्हाला ही संपूर्ण प्रक्रिया टाळून थेट पुढे जायचे असेल आणि जागरूक राहण्याचा संघर्ष करायचा नसेल, तर तुम्ही इतके निरागस झाले पाहिजे की, स्वतःला संपूर्णपणे समर्पित करू शकाल. समर्पण ही तुम्ही करण्यासारखी गोष्ट नाही. जेव्हा "तुम्ही स्वतः" उरत नाही, तेव्हा समर्पण घडून येते. जेव्हा तुमची स्वतःची इच्छा पूर्णपणे नाहीशी होते, जेव्हा तुमच्या आतमध्ये असे काहीही उरत नाही ज्याला तुम्ही "मी" म्हणता, तेव्हाच कृपा तुमच्यावर बरसते.
परंतु मी नेहमीच असे सांगेन की, जागरूकता आणि साधनेच्याच मार्गावर टिकून राहा. जर तुम्ही सहजपणे या प्रक्रियेच्या पलीकडे गेलात, तर ते अद्भुत आहे; पण जर तुम्ही जाणीवपूर्वक ही प्रक्रिया टाळण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही फक्त स्वतःचीच फसवणूक कराल, कारण ते अशा प्रकारे साध्य करता येत नाही. ते केवळ घडून येऊ शकते. ती अशी क्षमता नाही की, जी तुम्ही स्वतःहून निर्माण करू शकाल. जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व क्षमता आणि मर्यादा, तुमच्या सर्व आवडी-निवडी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, "हे मी आहे" असे तुम्हाला वाटायला लावणारे सर्व काही सोडून देण्यास तयार होता, जेव्हा तुमच्या मर्यादित व्यक्तिमत्त्वाला आधार देणारे सर्व काही सोडून देता, तेव्हा सुद्धा कृपा घडून येते. ती अशी गोष्ट नाही जी तुम्ही करू शकता; तुम्ही फक्त तिला घडू देऊ शकता. जागरूकता आणि साधनेच्या माध्यमातून तुम्ही अशी परिस्थिती निर्माण करू शकता की, ज्यामध्ये ती निश्चितपणे घडून येऊ शकते.
बंधनाचे हे जाळे आपण ज्या प्रकारे विचार करतो आणि अनुभवतो, त्यातूनच ते सतत विणले जात असते. आपण ज्या कोणत्या गोष्टीला जागरूकता म्हणतो, तिचा उद्देश फक्त एवढाच असतो की, तुमचे विचार व भावना आणि तुम्ही, यांच्यामध्ये एक अंतर निर्माण झाले पाहिजे. आणि आपण ज्या गोष्टीला साधना म्हणतो, ती म्हणजे तुमची ऊर्जा अशा पातळीवर उंचावण्याची एक संधी, ज्यामुळे तुम्ही या मर्यादांवर किंवा या यंत्रणांवर मात करू शकता, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला तुमच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये अडकवून घेतले आहे.
- सद्गुरू, (ईशा फाऊंडेशन)