
व्हिएतनाममध्ये बनावट ब्रँडेड वस्तूंच्या काळ्या बाजाराविरोधात सरकारने मोठी मोहीम सुरू केली असून, हो ची मिन्ह सिटीजवळील दोन गोदामांवर टाकलेल्या छाप्यात नायके, अॅडिडास, क्रॉक्स आणि गुच्ची या नामांकित कंपन्यांच्या लोगो असलेल्या २३ हजारांहून अधिक बनावट चप्पला जप्त करण्यात आल्या. जप्त मालाची किंमत सुमारे २ अब्ज व्हिएतनामी डाँग (सुमारे ७२.५६ लाख रुपये) असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
व्हिएतनाममध्ये अनेक वर्षांपासून बनावट लक्झरी वस्तूंची खुलेआम विक्री होत आहे. या जप्त केलेल्या गोदामांपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या हो ची मिन्ह सिटीच्या पर्यटन भागात या बनावट वस्तूंची मोठी बाजारपेठ भरते. परदेशात ज्या ओरिजिनल चपलांची किंमत ९०० डॉलर्सपर्यंत असते, त्यांची हुबेहूब नकली कॉपी या बाजारात अवघ्या ३० डॉलर्समध्ये विकली जाते. केवळ चपलाच नव्हे, तर 'शनेल'चे हँडबॅग्ज, 'प्राडा'चे टी-शर्ट आणि 'रोलेक्स'ची घड्याळे अशा अनेक महागड्या ब्रँड्सच्या बनावट वस्तूंनी येथील दुकाने सजलेली असतात. व्हिएतनाम बऱ्याच काळापासून जगभरातील लक्झरी ब्रँड्सच्या स्वस्त बनावट मालाचे मोठे केंद्र म्हणून ओळखले जाते.
व्हिएतनामवर आपली ही डागाळलेली प्रतिमा बदलण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठा दबाव येत आहे. या पार्श्वभूमीवर, मे महिन्यामध्ये व्हिएतनाम सरकारने बौद्धिक संपदा अधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध संपूर्ण देशात एक व्यापक मोहीम सुरू केली आहे. यामध्ये बनावट सामान, ऑनलाइन पायरसी आणि ट्रेडमार्कचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जात आहे.
यापूर्वीही अधिकारी वेळोवेळी कारवाई करत असत, पण सहसा त्यांचे लक्ष केवळ महागड्या हँडबॅग्ज किंवा सुटकेसवर असायचे. बाजार निरीक्षक कॅमेरा टीमसह यायचे, काही दुकानांतील सामान जप्त करायचे आणि काही दिवसांनी सर्व काही पुन्हा पूर्वीसारखेच सुरू व्हायचे. परंतु, या वेळची कारवाई पूर्वीपेक्षा अत्यंत वेगवान, व्यापक आणि कठोर आहे. या वेळच्या कडक कारवाईमागे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापारी धोरण हे एक मुख्य कारण मानले जात आहे. हे धोरण अमेरिकेच्या आर्थिक हितसंबंधांना बाधा आणणाऱ्या देशांवर कडक दबाव आणते.
गेल्या एप्रिल महिन्यात अमेरिकन व्यापार प्रतिनिधी कार्यालयाच्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आले की, व्हिएतनाम बौद्धिक संपदा अधिकारांचे संरक्षण करण्यात आणि जुन्या त्रुटी दूर करण्यात सातत्याने अपयशी ठरला आहे. गेल्या १३ वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या देशाला अशा प्रकारे दोषी धरण्यात आले असून, या अहवालात व्हिएतनामला बौद्धिक संपदा अधिकारांचे उल्लंघन करण्याच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा दोषी देश म्हणून घोषित करण्यात आले आहे.
- सुदेश दळवी