मडगाव : एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले आहे, याबद्दल आनंदच आहे. मात्र, त्याच धर्तीवर आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजालाही राजकीय आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी 'ऑल गोवा टॉडी टेपर्स एम्प्लॉईज असोसिएशन'तर्फे करण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारने ठोस प्रयत्न करावेत, अशी मागणी संघटनेने केली.
कुंकळ्ळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मारियो कुतिन्हो म्हणाले की, राज्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळाल्याने त्यांच्यासाठी किमान चार जागा आरक्षित होणार आहेत, ही सकारात्मक बाब आहे. आता सरकारने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत आणि विधानसभा अधिवेशनात या विषयावर चर्चा घडवून आणावी. सध्या ओबीसी वर्गवारीत १९ समाजांचा समावेश असून, टॉडी टेपर्स असोसिएशनतर्फे या सर्व घटकांच्या हक्काचा विषय मांडला जात आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघ आरक्षित करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत. या मागणीसाठी स्थानिक आमदारांना निवेदने दिली जाणार असून, 'ओबीसी महासंघ'ही या चळवळीला पुढे नेत आहे.
राज्याच्या सामाजिक व राजकीय जडणघडणीत ओबीसी समाजाचे मोठे योगदान आहे. मात्र, योग्य राजकीय प्रतिनिधित्व न मिळाल्याने या समाजाचे अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. विधानसभा निवडणुकीत ओबीसी बहुल मतदारसंघांमध्ये जागा राखीव ठेवल्यास वंचित घटकांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल. टॉडी टेपर्स, ख्रिश्चन आणि इतर मागास समुदायातील लोकांना राजकीय आरक्षण मिळाल्यास, पारंपारिक व्यवसायांना शासकीय संरक्षण व सवलती मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवता येईल, असेही ते म्हणाले.
संघटनेचे प्रतिनिधी फेलिक्स यांनी सांगितले की, राज्यात सर्व जाती-धर्माचे लोक आनंदात राहतात. एसटी समाजाने सातत्यपूर्ण पाठपुराव्याद्वारे राजकीय आरक्षण मिळवले. त्याचप्रमाणे, राज्यातील १९ समाजांचा समावेश असलेल्या बहुसंख्य ओबीसी घटकाला विधानसभेत लोकसंख्येनुसार राखीव जागा मिळायलाच हव्यात. एवढी मोठी लोकसंख्या असूनही राजकीय आरक्षण न मिळणे हा अन्याय आहे. सरकारने या समाजाला गृहीत न धरता त्यांचा हक्क त्यांना द्यावा. तसेच सर्व राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात या मागणीचा समावेश करून ओबीसी समाजाला न्याय द्यावा, असे आवाहनही असोसिएशनतर्फे करण्यात आले.


