यूट्यूबवरील 'सिक्रेट हाऊस' गेमचा व्हिडीओ पाहून २४ तासांचे चॅलेंज करण्यासाठी दोन मुलांनी सोडले घर

यूट्यूबवरील 'सिक्रेट हाऊस' गेम व्हिडिओ पाहून प्रेरित झालेल्या उत्तर प्रदेशातील दोन लहान मुलांनी २४ तासांचे चॅलेंज करण्यासाठी घर सोडले. पोलीस आणि मिशन शक्ती टीमने त्यांना दोन तासांत सुरक्षित शोधले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
6 mins ago
यूट्यूबवरील 'सिक्रेट हाऊस' गेमचा व्हिडीओ पाहून २४ तासांचे चॅलेंज करण्यासाठी दोन मुलांनी सोडले घर

मेरठ : यूट्यूब आणि सोशल मीडियावरील धोकादायक ऑनलाइन गेम्स आणि चॅलेंजेसचा तरुणाईसह लहान मुलांवर किती गंभीर परिणाम होत आहे, याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये समोर आला आहे. हस्तिनापूर येथील बी-ब्लॉक कॉलनीत राहणारी ११ आणि ७ वर्षांची दोन लहान मुलं यूट्यूबवरील एका 'गेमिंग चॅलेंज' व्हिडिओने प्रभावित होऊन अचानक घरातून बेपत्ता झाली. सुदैवाने, स्थानिक पोलीस आणि 'मिशन शक्ती'च्या टीमने अत्यंत तत्परता दाखवत अवघ्या दोन तासांत या दोन्ही मुलांना एका निर्जन स्थळावरून सुरक्षित शोधून काढले आणि त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ही दोन्ही मुले घरातून अचानक गायब झाली होती. पालकांनी सुरुवातीला आपल्या स्तरावर नातेवाईक, शेजारी आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, परंतु मुलांचा काहीही सुगावा न लागल्याने त्यांनी तातडीने मवाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी 'मिशन शक्ती'च्या विशेष पथकासह शोधमोहीम सुरू केली. अवघ्या दोन तासांत एका फार्महाऊसजवळील झाडीत आणि निर्जन ठिकाणी दोन्ही मुले लपलेली आढळली.

पोलीस चौकशीदरम्यान मुलांनी सांगितले की, त्यांनी यूट्यूबवर 'सीक्रेट हाऊस गेम'शी संबंधित व्हिडिओ पाहिले होते. या गेममध्ये खेळाडूंना काही नियमांचे पालन करत २४ तासांसाठी एका लपलेल्या ठिकाणी स्वतःचा 'गुप्त बेस' बनवून राहावे लागते. या व्हिडिओने प्रभावित होऊन मुलांनी स्वतः २४ तासांचे हे चॅलेंज पूर्ण करण्याचे ठरवले होते आणि घरातून बाहेर पडून फार्महाऊसजवळ आपले गुप्त ठिकाण तयार करत होते.

सर्कल ऑफिसर पंकज लवानिया यांनी सांगितले की, मुले कोणत्याही धोक्यात येण्यापूर्वीच त्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. सध्याच्या डिजिटल युगात लहान मुलांवर इंटरनेटवरील कंटेंटचा थेट आणि धोकादायक प्रभाव पडत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते. लहान मुले इंटरनेटवर नक्की काय पाहत आहेत, यावर पालकांनी बारीक लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


हेही वाचा
सर्व पहा