पणजी : अंदाजपत्रक उशिरा सादर झाल्याने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रद्द झालेल्या १०२ कोटी रुपये खर्चाच्या १२ प्रकल्पांना पुन्हा मंजुरी मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी ही माहिती दिली. या योजनेंतर्गत शिरोडा मतदारसंघातील एका कामाचा शुभारंभ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत गोव्यासाठी विविध प्रकल्प मंजूर झाले होते. मात्र, सरकारकडून वेळेत अंदाजपत्रक तयार करून सादर करण्यात न आल्याने हे प्रकल्प रद्द झाले होते. दिल्ली दौऱ्यात केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर रद्द झालेले प्रकल्प पुन्हा मंजूर करण्यात आले. या योजनेंतर्गत रस्त्यांची १२ कामे केली जाणार आहेत.
दरम्यान, बोरी पुलासाठी जमीन संपादनाच्या प्रक्रियेवर उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. सीआरझेड परवाना तसेच इतर आवश्यक सोपस्कार पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुलाच्या पुढील कामांना सुरुवात केली जाईल, असे कामत यांनी सांगितले.
खड्डे न बुजविल्यास माझ्याकडे तक्रार करा!
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने एक अॅप तयार केले आहे. या अॅपवर खड्ड्यांबाबत तक्रार नोंदवल्यानंतर ते बुजविण्याची कार्यवाही केली जाते. तक्रार नोंदवूनही खड्डे बुजविले गेले नाहीत, तर थेट माझ्याकडे तक्रार करावी, असे आवाहन दिगंबर कामत यांनी केले.


