पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने (गोमेकॉ) ऑनलाईन अपॉइंटमेंट सेवा सुरू केली आहे. आता गोमेकॉने ऑनलाईन ओपीडी सेवा देखील सुरू करावी. यामुळे दूर भागात राहणाऱ्या रुग्णांना गोमेकॉमध्ये यावे लागणार नाही. त्यांना व्हाट्सॲपद्वारे रिपोर्ट पाठवून प्रिस्क्रिप्शन देण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
सोमवारी गोमेकॉमधील लेक्चर हॉलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, डीन डॉ. जयप्रकाश तिवारी, आमदार मायकल लोबो उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, ऑनलाईन अपॉइंटमेंट या सेवेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या पेडणे, काणकोण किंवा अन्य दूर भागातील रुग्णांना केवळ डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन घेण्यासाठी गोमेको मध्ये यावे लागत आहे. ऑनलाईन ओपीडी सुरू केल्यास त्यांना व्हाट्सअॅप किंवा अन्य डिजिटल माध्यमातून प्रिस्क्रिप्शन देता येईल. असे झाल्यास येथे येणाऱ्या ५० टक्के रुग्णांचा फेरा वाचू शकतो. यामुळे रूग्ण आनंदी होतील तसेच गोमेकॉवरील ताण देखील कमी होईल. आरोग्य सचिव आणि डीन यांनी यासाठीची आवश्यक ती प्रक्रिया सुरू करावी.
गोमेकॉचा संपूर्ण कॅम्पस पंचतारांकित करणार : मुख्यमंत्री
ते म्हणाले, सरकार राज्यातील वैद्यकीय क्षेत्राला आवश्यक ती मदत करत आहे. येत्या काही दिवसांत आम्ही गोमेकॉचा संपूर्ण कॅम्पस पंचतारांकित करणार आहोत. सुमारे ५०० कोटी रुपये खर्चून रस्ते, पार्किंग, भूमिगत वीजवाहिन्या, हॉस्टेल अशी कामे सुरू केली जातील. सर्व कामे मार्च पर्यंत पूर्ण करण्याचे आमचे ध्येय आहे. सरकार गोमेकॉसाठी आवश्यक सर्व सुविधा, आधुनिक उपकरणे देण्यास तयार आहे. येथील डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांनी देखील रुग्णांना सहकार्य करणे आवश्यक आहे. रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक आम्हाला फोन करणार, मग आम्ही तुम्हाला फोन करणार अशी परिस्थिती येऊ देऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
वैद्यकीय क्षेत्रात एआय वापराबाबत विचार : विश्वजीत
विश्वजीत राणे म्हणाले की, मागील काही वर्षांत आम्ही गोमेकॉला आधुनिक उपकरणे आणि पायाभूत सुविधा देत आहोत. लवकरच येथे गार्ड डॉक्टरांसाठी हॉस्टेल बांधण्यात येईल. वैद्यकीय क्षेत्रात एआय वापराबाबत आम्ही विचार करत आहोत. जनरेशन झी आणि अल्फाच्या समस्या समजून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. यासाठी गोमेकॉ कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत विशेष चर्चासत्र आयोजित करावे. याला मी आणि मुख्यमंत्री देखील उपस्थित राहू.
गोमेकॉ, सुपर स्पेशलिटी ब्लॉक जोडणार
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सध्या रुग्णांना गोमेकॉतून सुपर स्पेशलिटी ब्लॉकमध्ये हलवण्यासाठी रुग्णवाहिक घालून मोठा फेरा मारावा लागतो. रुग्णांची हालचाल सहजपणे करता यावी यासाठी या दोन्ही इमारती जोडण्याचा विचार सुरू आहे. या इमारतीदरम्यान उड्डाणपूल बांधण्याबाबत आराखडा तयार करण्यात आला आहे.


