पणजी : व्हिसाची वैधता संपल्यानंतरही भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी क्राईम ब्रँचने दोन रशियन नागरिकांना अटक (Two Russian citiznes arrested) केली. वाडी करे, शिवोली येथील एका घरात दोघेही रशियन वास्तव्यास होते.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये बोरिस गुडकोव्ह (४७) आणि सर्गेई सिल्वान्स्कीय (४४) या रशियन नागरिकांचा समावेश आहे. क्राईम ब्रँचच्या (Crime Branch, Goa,India) माहितीनुसार, बोरिस गुडकोव्ह याच्या व्हिसाची मुदत २ एप्रिल २०२६ रोजी संपली होती. तर सर्गेई सिल्वान्स्कीयकडे भारतात वास्तव्य करण्यासाठी वैध व्हिसा नसल्याचे आढळून आले.
दोघेही वैध व्हिसाशिवाय भारतात वास्तव्यास असल्याने इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट, २०२५ मधील कलम ३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम २३(अ) अंतर्गत क्राईम ब्रँच पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. अटक करण्यापूर्वी दोन्ही संशयितांना अटकेचे कारण आणि कायदेशीर अधिकारांची माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांना अटक करण्यात आली.
दोन्ही संशयितांची अटकेची माहिती एफआरआरओ, पणजी यांच्या माध्यमातून रशियन वाणिज्य दूतावासाला देण्यात येत आहे. दोघांनाही वैद्यकीय तपासणी करण्यासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय नेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन बी. लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. क्राईम ब्रँचकडून या दोघांच्या भारतातील वास्तव्याबाबत अधिक तपास सुरू आहे.


