साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

‘बर्च’ प्रकरणी क्लब मालकांचा जामीन रद्द तर, कोलवाळ कारागृहात पुन्हा ड्रग्ज तस्करी

Story: गोवन वार्ता। न्यूज डेस्क |
37 mins ago
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भाजयुमोने काळे झेंडे दाखवले. कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात होणाऱ्या ड्रग्ज तस्करीचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लब अग्नितांडव आणि आरोग्य केंद्राच्या बनावट ‘ना हरकत’ प्रमाणपत्र प्रकरणात क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा बंधूंसह अजय गुप्ता यांचा जामीन गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार

रिअल इस्टेट प्रकल्पांत भागीदारीच्या बहाण्याने कंपनीला ८२ कोटींचा गंडा

गोव्यातील कुडका, एल्ला आणि केळशी येथील रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये एक तृतीयांश भागीदारी देण्याच्या बहाण्याने नवी दिल्लीतील एका कंपनीला ८२ कोटी ७८ लाख ६५ हजार १७२ रुपयांचा गंडा घालण्यात आला.

तिस्क वेली-उसगाव येथे वीज खांब कोसळून कंत्राटी कामगाराचा मृत्यू

तिस्क वेली-उसगाव येथे नवीन वीज खांब घालण्याचे काम सुरू असताना वीज खांब कोसळून खेमलाल (३६) या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इस्पितळात दाखल केला आहे.

शिवोलीतील महिलेची ८५.५ लाखांची फसवणूक

व्यवसायात गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ८५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना शिवोली येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून हणजूण पोलिसांनी मुंबईतील दोन संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सोमवार 


काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांना भाजयुमोने दाखवले काळे झेंडे

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी दाबोळी विमानतळावर आलेले भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते यांच्यासमोर काँग्रेस कार्यकर्ते आल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले. एकमेकांविरोधात घोषणा देणे, धक्काबुक्की करणे वगैरे प्रकार घडले. तथापि तेथे मोठ्या प्रमाणात तैनात असलेल्या पोलिसांनी परिस्थितीवर योग्य नियंत्रण ठेवल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. मात्र या घटनेमुळे वाहतुकीवर परिणाम झाला.

सांगे पोलिसांशी वाद; पाच संशयितांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सांगे पोलीस ठाण्यात गोंधळ घालणे, पोलिसांशी वाद घालणे तसेच घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पाच संशयितांचा अटकपूर्व जामीन दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. संशयित मेश्यू डिकॉस्टा, दत्ताराम राऊत देसाई, विराज नागेकर, प्रितानंद कुर्डीकर आणि सूरज बाळ्ळीकर यांच्या जामीन अर्जांवर एकत्रित सुनावणी घेण्यात आली.

मद्यधुंद कारचालकाची गायीसह दुचाकीला धडक

मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवताना संशयित मुबारक शेख (रा. धर्मापूर) याने नावेली येथे रस्त्यावर बसलेल्या गायीला धडक दिली. त्यानंतर कारवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला.

रेल्वे प्रवासादरम्यान तरुणाचे अपहरण, गुन्हा नोंद

मडगाव येथून बिहारमधील आपल्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वेने निघालेल्या सोयब मलिक (३१) या तरुणाचे प्रवासादरम्यान अपहरण झाल्याची तक्रार त्याचे वडील मोहम्मद मोजिबुर्रहमान यांनी नोंदवली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोकण रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.

मंगळवार 

थर्मासमधून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या महिला सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात होणाऱ्या ड्रग्ज तस्करीचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या सुरक्षारक्षक महिलेकडे गांजा व चरससह मोबाईल व एटीएम कार्ड सापडली आहेत. संशयित सुरक्षारक्षक महिलेचे नाव आशा चोडणकर असून ती कारागृहात सेवा बजावत होती. संशयित महिलेकडून २३६ ग्रॅम गांजा, २ ग्रॅम चरस, तीन मोबाईल व तीन एटीएम कार्ड जप्त करण्यात आली आहेत.


‘बर्च’चे मालक लुथरा बंधूंसह अजय गुप्ता यांचा जामीन रद्द

हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लब अग्नितांडव आणि आरोग्य केंद्राची बनावट ‘ना हरकत’ प्रमाणपत्र (एनओसी) प्रकरणात क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा बंधूंसह अजय गुप्ता यांना सत्र न्यायालयाने मंजूर केलेला जामीन गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला. याबाबतचा आदेश न्यायाधीश डॉ. नीला गोखले यांनी दिला.

मयडे येथे वाहनाच्या धडकेने पादचारी ठार

मयडे येथील पुलावर अज्ञात वाहनाने पादचारी युवकाला धडक दिल्याने झालेल्या हिट अँड रन अपघातात आंतोनिओ जॉनी क्वाव्रोस (३५, रा. आताफोंड, मयडे) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बुधवार 

तरुण तेजपालप्रकरणी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात

‘तेहलका’ मासिकाचा तत्कालीन संपादक तरुण तेजपाल याला महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार प्रकरणात गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची, तसेच १० लाख २१ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य विचारात घेता दिलेली शिक्षा अत्यंत अपुरी आणि सौम्य आहे, असा दावा करून गोवा सरकारने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे.

मयडे येथील ‘हिट अँड रन’प्रकरणी वाहनचालकाला अटक

मयडे येथील पुलावर झालेल्या ‘हिट अँड रन’ प्राणघातक अपघातप्रकरणी म्हापसा पोलिसांनी कोंबडीवाहू वाहनचालक रोहन पाटील (३२, रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) याला अटक केली. या अपघातात सुरक्षारक्षक आंतोनिओ जॉनी क्वाव्रोस (३५, रा. आताफोंड, मयडे) यांचा जागीच मृत्यू झाला होता.

४० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तारक आरोलकर याला अटक

आसगाव येथील जमिनीचा मालक असल्याचे भासवून बनावट विक्री कराराद्वारे दिल्लीतील पंकज बजाज यांची ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा शाखेने म्हापशाचे माजी नगरसेवक तारक आरोलकर याला अटक केली आहे.

गुरुवार 


दहा वर्षांच्या कारावास शिक्षेविरोधात तेजपाल सर्वोच्च न्यायालयात

तेहलका मासिकाचे तत्कालीन संपादक तरुण तेजपाल याने महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार प्रकरणात मिळालेल्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने सुनावलेल्या १० वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला त्याने आव्हान दिले आहे.

कोलवाळ क्रीडा संकुलात मोबाईल टॉवर उभारण्यास ग्रामस्थांचा विरोध

कोलवाळ येथील क्रीडा संकुलाच्या जागेत प्रस्तावित मोबाईल टॉवर उभारण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. क्रीडा मैदानाचीही जागा केवळ स्थानिक खेळाडू, क्रीडा स्पर्धांसाठी राखीव असावी, तिथे कोणत्याही प्रकारच्या इतर गोष्टी नकोत, असा आक्रमक पवित्रा घेत रहिवाशांनी मोबाईल टॉवरचे काम तातडीने बंद करण्याची मागणी केली.

कळंगुट पंचायतीकडून चार नाईट क्लब सील

कळंगुट पंचायतीने बागा येथील टिटोज लेन परिसरात वैध परवान्यांशिवाय सुरू असलेले चार नाईट क्लब सील केले. लिजेंड, कर्मा, डाऊन द रोड (डीटीआर) आणि हवेली या क्लबचा त्यात समावेश आहे.

शुक्रवार


कोलवाळ कारागृहातील छापेमारीत सहा मोबाईल सापडले

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात ड्रग्ज तस्करीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कारागृह प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारागृहाची झडती घेतली. या छापेमारीतून सहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा बाप दोषी

मुरगाव तालुक्यातील १६ वर्षीय स्वतःच्याच मुलीवर २०२४ मध्ये लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मेरशी येथील पाॅक्सो न्यायालयाने बापाला दोषी ठरविले. शिक्षेची सुनावणी २४ आॅगस्ट रोजी होणार आहे. याबाबतचा निवाडा न्या. डाॅ. पूजा कवळेकर यांनी जारी केला आहे.

शनिवार

जेलमधील ड्रग्ज तस्करी डबल मर्डरची आरोपी रविना लोबोसाठी

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात उघडकीस आलेल्या अमली पदार्थ तस्करी प्रकरणात कोलवाळ पोलिसांनी मोठी कारवाई करत महिला कैदी रविना लोबो हिला अधिकृतपणे अटक केली आहे. गोवा मानव संसाधन विकास महामंडळाची (जीएचआरडीसी) संशयित सुरक्षारक्षक आशा रेवानंद चोडणकर हिने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सिकेरी-मये येथे गोशाळा परिसरातील घराला आग

सिकेरी-मये येथे गोमंतक गोसेवा महासंघाचे अध्यक्ष कमलाकर तारी यांच्या राहत्या घराला आणि गोशाळा परिसराला अचानक भीषण आग लागली. घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य नेहमीप्रमाणे सायंकाळच्या भजनात मग्न असताना अचानक स्वयंपाकघराच्या बाजूने धूर आणि आगीचे प्रचंड लोट निघत असल्याचे निदर्शनास आले.

लक्षवेधी

गोवा विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील वरिष्ठ प्राध्यापक प्रा. राजेंद्र गाड यांची विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचा आदेश राज्यपाल तथा कुलपती पुसापती अशोक गजपती राजू यांनी जारी केला. माजी कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्या कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली.

विविध खात्यांमध्ये सलग १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. लवकरच आणखी २००० जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

सोशल मीडियावर मैत्री करून परदेशातून पाठवलेल्या कुरियरमध्ये बेकायदेशीर रोख रक्कम असल्याचे सांगत काणकोण तालुक्यातील ३६ वर्षीय महिलेची तब्बल ३६ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर विभागाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

वास्को येथील बहुचर्चित मंदार सुर्लकर अपहरण आणि हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याच्या गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला मंदारचे वडील दीपक सुर्लकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.


हेही वाचा
सर्व पहा