पणजी : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत प्रतिबंधित ट्रिम्बल जीपीएस उपकरण आढळून आले. त्यानंतर या प्रकरणी राजस्थानमधील कैलाश चंद यादव (वय ४४) याच्याविरुद्ध मोपा विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १.५० वाजता कैलाश चंद यादव हा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडिया एक्स्प्रेसच्या आयएक्स-१४९० (IX-1490) या विमानाने दिल्लीला जाण्याच्या तयारीत होता. देशांतर्गत सुरक्षा तपासणीदरम्यान (Domestic SHA) प्रवाशाच्या बॅगेत एटीआरएस प्रणालीद्वारे एका ट्रिम्बल जीपीएस उपकरणाची माहिती मिळाली.
तपासणीदरम्यान आढळलेले हे उपकरण भारतात प्रतिबंधित असल्याचे समोर आले. तसेच, संबंधित उपकरण बाळगण्यासाठी आवश्यक असलेला परवाना किंवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी कैलाश चंद यादव याच्याकडे नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी सीआयएसएफचे जवान शंतनू प्रमाणिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर आरोपीला भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली. या प्रकरणाचा तपास मोपा विमानतळ पोलीस ठाण्याचे पीएसआय अक्षय पार्सेकर यांनी केला.
प्रकरण पेडणे जेएमएफसी न्यायालयात प्रलंबित
पोलिसांनी याप्रकरणी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी पेडणे जेएमएफसी न्यायालयात प्रलंबित आहे.


