कॅन्सरची माहिती सात दिवसांत द्या; सरकारचे सर्व वैद्यकीय संस्थांना निर्देश

कॅन्सर ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित : रुग्णांची नोंद आणि देखरेख होणार नियमित; गोवा सरकारने कर्करोगाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित केले आहे. राज्यात नव्याने निदान होणाऱ्या प्रत्येक कर्करोगाच्या रुग्णाची नोंद करणे आरोग्य संस्थांना बंधनकारक करण्यात आले आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
कॅन्सरची माहिती सात दिवसांत द्या; सरकारचे सर्व वैद्यकीय संस्थांना निर्देश

पणजी : गोवा सरकारने कर्करोगाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित केले आहे.  राज्यात नव्याने निदान होणाऱ्या प्रत्येक कर्करोगाच्या रुग्णाची नोंद करणे आरोग्य संस्थांना बंधनकारक करण्यात आले आहे. निदान झाल्यानंतर शक्यतो सात दिवसांत आणि कोणत्याही परिस्थितीत एका महिन्याच्या आत संबंधित प्राधिकरणाला माहिती देणे गरजेचे आहे.

याविषयीची अधिसूचना आरोग्य खात्याने जारी केली आहे. त्यात कर्करोगाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित केले आहे. गोवा सार्वजनिक आरोग्य कायदा, १९८५ मधील कलम ५७ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

गोव्यातील कर्करोगाच्या रुग्णांची नोंद आणि देखरेख आता अधिक पद्धतशीरपणे केली जाणार आहे. नव्याने निदान होणाऱ्या सर्व कर्करोगाच्या रुग्णांची नोंद संबंधित नियुक्त प्राधिकरणाकडे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हिस्टोपॅथॉलॉजी, सायटोलॉजी, हेमॅटॉलॉजी, इमेजिंग, क्लिनिकल निदान किंवा अन्य मान्यताप्राप्त निदान पद्धतींमधून आढळलेल्या कर्करोगाच्या प्रकरणांची माहिती द्यावी लागेल.

दरम्यान, कर्करोगाचे निदान किंवा उपचार करणारे प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिक, पॅथॉलॉजिस्ट, वैद्यकीय संस्था आणि आरोग्य आस्थापने या अधिसूचनेच्या कक्षेत आली आहेत.

आरोग्य सेवा संचालनालय राज्यस्तरीय कॅन्सर रजिस्ट्री आणि राज्य कॅन्सर सर्व्हिलन्स सिस्टम स्थापन करणार आहे. या प्रणालीद्वारे कर्करोगाच्या नोंदवलेल्या प्रकरणांचे संकलन, पडताळणी, विश्लेषण आणि देखरेख केली जाणार आहे. कर्करोगाच्या रुग्णांशी संबंधित वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवणे बंधनकारक असेल. या माहितीचा वापर प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य देखरेख, कार्यक्रमांचे नियोजन, संशोधन आणि निरीक्षणासाठी केला जाईल.

सर्व संबंधित आरोग्य प्राधिकरणे, रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, प्रयोगशाळा आणि इतर संबंधित घटकांना अधिसूचनेतील निर्देशांचे काटेकोर पालन करावे लागेल. निर्देशांचे पालन न केल्यास कायद्याअंतर्गत योग्य ती कारवाई करण्यात येईल.

कर्करोगामुळे झालेल्या मृत्यूची माहिती देणेही बंधनकारक

नव्याने निदान झालेल्या कर्करोगाच्या प्रत्येक प्रकरणाची माहिती शक्य तितक्या लवकर, शक्यतो सात दिवसांत द्यावी लागेल. कोणत्याही परिस्थितीत निदानाच्या तारखेपासून एक महिन्यापेक्षा उशीर करता येणार नाही. कर्करोगामुळे झालेल्या मृत्यूची माहितीही देणे आवश्यक राहणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा